नांदेड : विषारी साप चावल्याने शेतकऱ्याचा मृत्यू 

प्रल्हाद कांबळे
Saturday, 12 September 2020

नातेवाईकांनी सरकारी दवाखाना धर्माबाद येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांनी पंधरा दिवस मृत्यूशी झुंज दिली परंतु अखेर त्यांचा गुरुवारी (ता. १०) दुपारी साडेतीनच्या सुमारास मृत्यू झाला. मारोती गंगाधर बहीरवाड (वय ४८) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. 

नांदेड : धर्माबाद तालुक्यातील चिकना शिवारात सोयाबीन पीकावर फवारणी करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या पायाला विषारी सापाने कडकडून चावा घेतला. त्यांना लगेच नातेवाईकांनी सरकारी दवाखाना धर्माबाद येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांनी पंधरा दिवस मृत्यूशी झुंज दिली परंतु अखेर त्यांचा गुरुवारी (ता. १०) दुपारी साडेतीनच्या सुमारास मृत्यू झाला. मारोती गंगाधर बहीरवाड (वय ४८) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. 

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, चिकना (ता. धर्माबाद) येथील शेतकरी मारोती गंगाधर बहीरवाड हे ता. २८ आॅगस्ट रोजी आपल्या शेतावर सोयाबीन पिकावर फवारणी करण्यासाठी गेले होते. फवारणी करत असतांना त्यांच्या पायाला परड या विषारी सापाने चावा घेतला. यावेळी त्यांची प्रकृती खालावत चालल्याने त्यांना नातेवाईकांनी नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार करुन प्रकृती ठीक झाल्याचे सांगून त्यांना रुग्णालयातून ता. सहा सप्टेंबर रोजी सुटी देण्यात आली. 

हेही वाचा नांदेड : पिककर्ज वाटपाचे प्रमाण कमीच, जिल्ह्यात ३५ टक्के कर्ज वाटप -

धर्माबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद 

ते आपल्या घरी गेले. मात्र दोन दिवसांनी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. लगेच त्यांना धर्माबाद येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांच्यावर येथे उपचार सुरु असताना ता. १० सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती चंद्रकांत मारोती बहीरवाड (वय २६) यांच्या माहितीवरुन धर्माबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हवालदार श्री. जाधव करत आहेत. 

गळफास घेऊन एकाची आत्महत्या 

नांदेड- शहराच्या आंबेडकरनगर भागात राहणारे राष्ट्रपाल दत्तात्रय नरवाडे (वय ४३) यांनी आपल्याच घराच्या खिडकीच्या गजाळीला दोरीने ता. नऊ सप्टेंबर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांच्या घरच्याना दिसले. त्यांनी लगेच विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय सुत्रांनी सांगितले. या प्रकरणाची माहिती संघपाल नरवाडे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिल्यावरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस हवालदार श्री. पांचाळ करत आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: A farmer died after being bitten by a poisonous snake nanded news