
नांदेड : पीककर्ज परतफेड केल्यानंतरही मिळेना कर्ज
माहूर : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वाई बाजार येथे पीक कर्ज वाटपात शेतकऱ्यांसोबत दुजाभाव केला जात असल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत. थकित खातेदारांना कर्ज भरायला लावायचे आणि पुन्हा त्यांना नियमित कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत बँकेचा उंबरठा झिजवायला लावायचं अशी काहीशी पद्धत वाई बाजार शाखेचे व्यवस्थापक अवलंबवित असून यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करत खरीप बँके समोर ताटकळत बसून रहाण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.
माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेतील व्यवस्थापक व त्यांच्या अधिनस्त बँक ऑफिसर हे आरबीआयचे निर्देश आणि अग्रणी बँकेच्या सुचना पायदळी तुडवत तुघलकी कारभाराचा कारभाराचा कळस गाठत आहेत.
बँक व्यवस्थापनासमोर शाखेचा डॅमेज कंट्रोल सावरण्यासाठी शेतकऱ्यांचा छळ करत आहेत. शेतकऱ्यांकडून काही कारणास्तव थकित झालेल्या पिक कर्ज वसुलीसाठी शासन आदेश धुडकावून तगादा लावून, नोटीस वर नोटीस पाठवून शेतकऱ्याकडून जुलमी राजवटीत लगान वसूल केल्याप्रमाणे पीक कर्जाची वसुली केली. शिवाय शाखा व्यवस्थापक बनकर यांनी अनेक शेतकऱ्यांना कर्ज भरल्यानंतर दोन दिवसात कर्ज देण्याची हमी देऊन बँकेचे हेलपाटे मारायला लावत आहेत.
मी एक प्रगतशील शेती विषयक पुरस्कार प्राप्त शेतकरी असून कापूस, सोयाबीन पिकांबरोबरच फळ बागेची शेती करत असतो. माझे वडील दिर्घ आजारी असून हैदराबाद येथे उपचार घेत आहेत. अशा परिस्थितीत मला पैशाची नितांत गरज आहे.
- संदीप पडलवार, शेतकरी, आमिनगुडा, रामनगर
माझ्या मयत आईच्या नावे असलेले पीक कर्ज रक्कम भरणा केल्यानंतर दोन दिवसात मला नियमित कर्ज देणार असल्याची शाखा व्यवस्थापक बनकर यांनी हमी दिली होती. पंधरा ते वीस दिवसापासून सातत्याने बँकेत दिवसभर बसून राहत आहे. परंतु आमच्या शाखेत कर्मचारी संख्या कमी असल्याने कर्ज देण्यासाठी उशीर लागेल असे सांगून शाखा व्यवस्थापक नियमित कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आहे.
- संदेश टनमने, शेतकरी, हरडप
Web Title: Nanded Farmer Loans Not Available Even Repaying Crop Loans Maharashtra Gramin Bank
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..