
नांदेड : सहा लाख ७३ हजार क्विंटल हरभरा खरेदी
नांदेड : जिल्ह्यात किमान हमी दरानुसार नाफेडने तीन यंत्रणेच्या माध्यमातून ५४ ठिकाणी सहा लाख ७३ हजार २७३ क्विंटल हरभरा खरेदी केला आहे. आॅनलाईन नोंदणी केलेल्या ४० हजार ८४९ शेतकऱ्यांपैकी ३५ हजार २६४ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून देण्यात आली.
रब्बी हंगाम २०२२ खरेदी योजनेतंर्गत यंदा जिल्ह्यात किमान हमी दरानुसार हरभरा विक्रीसाठी ता. एक मार्च पासून सुरुवात झाली. यात दि महाराष्ट्र स्टेट मार्केटींक फेडरेशन मुंबईकडून दहा, विदर्भ मार्केटींक फेडरेशन नागपूरकडून दोन तर महाफार्मर प्रोड्यूसर कंपनी पुणे कडून ४२ अशा एकूण ५४ ठिकाणी खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकर्यांचा हरभरा खरेदी करण्याची मुदत प्रांरभी ता. २७ मे पर्यंत निश्चित केली होती. यानंतर यास ता. १७ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
परंतु शासनाने निर्धारीत केलेला खरेदीचा कोटा पूर्ण झाल्यामुळे खरेदी यापूर्वीच बंद करण्यात आली. यामुळे बरेच शेतकरी हरभरा विक्री विना शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात या कालावधीत आॅनलाइन नोंदणी केलेल्या ४० हजार ८४९ शेतकर्यांपेकी ३५ हजार २६४ शेतकर्यांचा सहा लाख ७३ हजार २७३ क्विंटल हरभरा खरेदी केला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून देण्यात आली.
महिन्यापासून चुकारे थकले
हरभरा खरेदीच्या अंतिम टप्यात शासकीय खरेदी केंद्रावर हरभरा दिलेल्या शेतकर्यांचे चुकारे मागील एक महिन्यापासून थकले आहेत. ऐन पेरणीच्या हंगामात शेतकर्यांना हरभर्याचे पेसे मिळत नसल्याने ते खरेदी केंद्र संचालकांच्या मागे आहेत. परंतु नाफेडकडून पैसे मिळाले नसल्याने चुकारे थकल्याची माहिती केंद्र चालक देत आहेत. परंतु शेतकरी ऐकण्याच्या स्थितीत नसल्याचे एका केंद्र चालकाने सांगितले.
हरभरा खरेदीत महाएफपीसी अव्वल
जिल्ह्यात हमी दरानुसार सर्वाधीक चार लाख ८६ हजार ३२० क्विंटल हरभरा खरेदी महाएफपीसी ४२ केंद्रावर झाली. तर महाराष्ट्र स्टेट मार्केटींक फेडरेशनच्या दहा खरेदी केंद्रावर एक लाख ४० हजार ४०७ क्विंटल व विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या दोन खरेदी केंद्रावर ४६ हजार ५४५ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.
Web Title: Nanded Farmer Six Lakh 73 Thousand Quintals Of Gram Purchase
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..