नांदेड : समाधानकारक पावसाने पेरण्यांना गती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded rainfall all over district

नांदेड : समाधानकारक पावसाने पेरण्यांना गती

नांदेड : गेल्या २४ तासात जिल्ह्यात सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत सरासरी ३७.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण १९९.८० मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला असून सरासरीच्या १०६ टक्के आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये समाधान असून उर्वरित खरीप पेरण्यांना गती येणार आहे. हा पाऊस पेरणी झालेल्या पिकांना देखील अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याची माहिती कृषि विभागाने दिली आहे.

यंदाच्या वर्षी जूनमध्ये म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची चिंता लागली होती. मात्र, गेल्या दोन दिवसात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उर्वरित खरीप पेरण्यांना गती येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवीशंकर चलवदे यांनी दिली.

दरम्यान, मागील वर्षी शेतकऱ्यांना सोयाबीन बिजोत्पादनाचे प्रशासनाने आवाहन केले होते. त्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. तसेच सोयाबीन उगवण क्षमतेबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन आणि कृषी विभागाने प्रचार व प्रसिद्धी केली. त्यामुळे यावर्षी सोयाबीन उगवणीबाबत तक्रारी नाहीत. उगवण चांगली झाली आहे. बाजारात कंपन्यांचे बियाणे मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहिले असल्याचे दिसून येत आहे. तसेच शेतकऱ्यांनी स्वतः चे बियाणे राखून ठेवल्याने कंपन्यांनी व विक्रेत्यांनी बाजारातील सोयाबीन बियाणाचे भाव देखील कमी केले होते.

यंदा जिल्ह्यात सर्वाधीक शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन पेरले. घरचे बियाणे बाजारातील बियाणांपेक्षा चांगले निघाल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. यंदा सोयाबीनची उगवणही चांगली झाली. उगवणीबाबत क्वचितच तक्रारी आल्या. ठोक विक्रेत्यांकडे विविध कंपन्याच्या सोयाबीनच्या अनेक बॕगा शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. जनजागृतीमुळे सोयाबीन बियाणात शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांची बचत झाली आहे.

जिल्ह्यातील २४ तासातील पाऊस

नांदेड जिल्ह्यात सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत २४ तासात सरासरी ३७.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण १९९.८० मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी एकूण पावसाची आहे. नांदेड - ३७.२० (१७९.९०), बिलोली - ४१.१० (१५५.८०), मुखेड - २५.८० (२५०.६०), कंधार - ५१.६० (२८६.७०), लोहा - ६८.४० (२०६.२०), हदगाव - ३२.३० (१६१.१०), भोकर - ३६.४० (१३४.१०), देगलूर - २४.७० (२५४.५०), किनवट - ३४.५० (२२०.९०), मुदखेड - ३२.२० (२३२.४०), हिमायतनगर - ७८.९० (२८२.४०), माहूर - ११.६० (१४४.८०), धर्माबाद - १९.१० (१५६.८०), उमरी - ३७.१० (१८६.९०), अर्धापूर - ४०.८० (१३९.९०), नायगाव - ४१ (१३१.४०)

Web Title: Nanded Farmer Sowing Start Monsoon Rainfall All Over District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top