नांदेड : पीकविमा प्रकरणी शेतकरी संघटनेतर्फे जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक

प्रल्हाद कांबळे
Sunday, 29 November 2020

नांदेड जिल्ह्यात पीकविम्याचा प्रश्न आता गंभीर विषय बनला आहे. याबाबत 'जिजाऊ', आनंदनगर, नांदेड येथे जिल्ह्यातील प्रमुख शेतकऱ्यांची बैठक रविवार ता. 29 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली

नांदेड - नांदेड जिल्ह्यातील पीकविमा प्रकरणी जिल्ह्यातील प्रमुख शेतकऱ्यांची बैठक आनंदनगर, नांदेड येथे घेण्यात आली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्क आणि न्यायालयीन लढाईची तयारी याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात पीकविम्याचा प्रश्न आता गंभीर विषय बनला आहे. याबाबत 'जिजाऊ', आनंदनगर, नांदेड येथे जिल्ह्यातील प्रमुख शेतकऱ्यांची बैठक रविवार (ता.२९) नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. या बैठकीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड. धोंडीबाराव पवार, गोविंदराव मुंडकर, दिगंबरराव शिंदे, प्रा. शिवाजीराव मोरे यांची विशेष उपस्थिती होती. या बैठकीत पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध उपाययोजना यावर सविस्तर चर्चा होऊन प्रारंभी विमा कंपनी, कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्याशी पत्रव्यवहार व चर्चा करण्यात यावी. त्यानंतर शासन दरबारी शिष्टमंडळ नेण्याचे प्रयत्न करण्याचे ठरले आहे. त्यानंतर अंतत: न्यायालयात प्रकरण दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा - कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात ताळेबंदीच्या (लॉकडाउन) कालावधीत 31 डिसेंबरपर्यंत वाढ -

पीकविमा प्रकरणी लढाईचे स्वरूप ठरविण्यासाठी मंगळवार (ता. एक) डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढा, नांदेड येथे बैठक घेण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड. धोंडीबाराव पवार यांनी कळविले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक तालुक्यात शेतकरी स्वयंस्फूर्तपणे पीकविम्याबाबत संघर्ष करत आहेत. याविषयी सर्वांनी एकत्र येऊन संपूर्ण ताकदीने लढा देण्यासाठी या बैठकीत नियोजन करण्यात येणार आहे. या बैठकीस विमा पिडीत शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Farmers in the district are aggressive on behalf of the farmers' association in the crop insurance case nanded news