
Nanded : नऊ हजार शेतकऱ्यांना ३६ कोटींचा प्रोत्साहन लाभ
नांदेड : जिल्ह्यात महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत अल्पमुदतीच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या नऊ हजार ३२१ शेतकऱ्यांना ३६ कोटी ५८ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित ३० हजार शेतकऱ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अल्पमुदतच्या कर्जाची नियमित परतफेड केली त्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन योजना लाभ देण्याची घोषणा तत्कालीन सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली होती. दरम्यान याच काळात म्हणजेच २०२० मध्ये कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र राज्याची आर्थिक घडी विस्कटून गेली.
परिणामी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ शेतकऱ्यांना वितरीत करता आले नाहीत. सध्या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत आहे. या योजनेत नांदेड जिल्ह्यातील ६२ हजार ५०४ पात्र शेतकऱ्यांची यादी बँकेने अपलोड केली आहे. यातील ३२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या विशिष्ट क्रमांकासह याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
त्यापैकी ३० हजार ७२० शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. तर दोन हजार १७९ शेतकरी आधार प्रमाणिकरणाचे बाकी आहेत. आधार प्रमाणिकरण झालेल्या नऊ हजार ३२१ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन लाभाचे ३६ कोटी ५८ लाख रुपये जमा झाल्याची माहिती मिळाली.
उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच रक्कम मिळेल
उवर्रित २४ हजार ४९६ शेतकऱ्यांच्या खत्यावर लवकरच रक्कम जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी तालुकास्तरीय समिती तसेच जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या शेतकऱ्यांनी तालुका सहनिबंधक कार्यालयाकडे संपर्क करुन कागदपत्राची पुर्तता करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
प्रोत्साहन योजनेमधील महत्त्वाच्या बाबी
या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी २०१७-२०१८, २०१८-२०१९, २०१९-२०२० या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची फेड केली तरच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. २०१७-२०१८ चे पिक कर्ज ता.
३० जून २०१८ पर्यंत पूर्णतः परतफेड करणे गरजेचे. २०१८ - २०१९ या वर्षातील पिक कर्ज ता.३० जून २०१९ पर्यंत पूर्णतः परतफेड करणे गरजेचे. २०१९-२०२० चे कर्ज ता.३१ ऑगस्ट २०२० पर्यंत फेडलेले असणे गरजेचे आहे. प्रोत्साहन योजनेचा लाभ देताना एखाद्या शेतकऱ्याने अनेक बँकांकडून कर्ज घेतलेले असेल अशावेळी एक किंवा अनेक बँकाकडून घेतलेल्या अल्पमुदत पिक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेवून ५० हजार या कमाल मर्यादेत लाभ मिळणार आहे.