
नांदेड : निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांची संकटे पाठ सोडायला तयार नाही. खरिपातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. त्यानंतर अतिवृष्टीमुळे कपाशी आणि तूर पिकाच्या उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यातच आता उरलेल्या पिकांवर वन्यप्राण्यांचा धुडगुस वाढल्याने शेतकरी कमालीचे चिंताग्रस्त झाले आहेत.
सध्या शेतामध्ये कपाशी, तूर, भाजीपाला आणि काही प्रमाणात सोयाबीन व इतर पिके आहेत. शेतकऱ्यांना पिकांच्या रखवालीकरिता दिवसरात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे. सदद होणारी नापिकी व अशातच मोकाट जनावरे, माकडांसोबतच रानडुक्कर, रोहीसारख्या वन्यप्राण्यांचा हैदोस यामुळे शेतकरी हताश झाले आहेत.
शेतातील पिकांचे रक्षण करण्यासाठी रात्रीच्या वेळेस गस्त घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. वनविभागाने वन्य प्राण्यांचा कायम बंदोबस्त करावा, तसेच नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया सुकर करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.
विविध युक्त्या ‘फेल’
वन्यप्राणी व मोकाट जनावरांपासून होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी विविध युक्त्या करून थकले आहेत. बुजगावणे, फटाके फोडणे, वाघाची डरकाळी, सोलर कुंपण, ओरडण्याचा आवाज, साड्यांचे कुंपण, टेबल फॅनचे पाते आणि परात आदी पर्याय वापरले जातात. या सगळ्या ‘आयडिया’ वन्यप्राणी आणि मोकाट जनावरांना नित्याचे झाल्याने त्याचा पाहिजे तितका फायदा होताना दिसत नाही.
नुकसानीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असते. नुकसान मोठ्या प्रमाणात होत असते. पण मिळणारी नुकसानभरपाई तुटपुंजी असते. मदत त्वरित मिळत नसल्याने शेतकरी नुकसान भरपाई मागायला धजावत नाही.
- रामकृष्ण गावंडे, शेतकरी
मोकाट जनावरे, माकडांसोबतच गावठी डुक्कर आणि रानडुकरांनी माझ्या शेतातील उभ्या पिकांची कित्येकदा नासाडी केली आहे. त्यामुळे मला अनेकदा दुबार लागवड करावी लागली. प्राण्यांपासून खरीप आणि रब्बी पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतात दिवसरात्र राखण करावी लागत असते.
- बालाप्रसाद घायट, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.