नांदेड : महापालिकेच्या स्थायीत जाण्यासाठी अनेकांची फिल्डिंग, येणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे लक्ष

प्रल्हाद कांबळे
Friday, 4 December 2020

स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ ता. एक डिसेंबर रोजी संपला आहे. म्हणून नव्याने आठ सदस्यांची निवड येणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. त्यामुळे अनेकांनी वरिष्ठ नेत्याकडे फिल्डींग लावली आहे. 

नांदेड : नांदेड- वाघाळा शहर महापालिकेच्या आर्थिक चाब्या असणाऱ्या स्थायी समितीवर वर्णी लागण्यासाठी काँग्रेसमध्ये दिग्गज पुन्हा एकदा सक्रिय झाले असून येथील प्रवेशानंतर सभापतीपदावर या दिग्गजांचा निशाना राहणार आहे. स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ ता. एक डिसेंबर रोजी संपला आहे. म्हणून नव्याने आठ सदस्यांची निवड येणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. त्यामुळे अनेकांनी वरिष्ठ नेत्याकडे फिल्डींग लावली आहे. 

दयानंद वाघमारे, पूजा पवळे, अब्दुल रशीद अब्दुल गणी, फारुख हुसेन, ज्योती कल्याणकर, श्रीनिवास जाधव, राजेश यन्नम आणि करुणा कोकाटे यांचा समावेश आहे. या सदस्यांच्या कालावधीसह विद्यमान सभापती अमितसिंह तेहरा यांचा सभापती पदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे सदस्य निवडीनंतर सभापतीपदाची निवड होणार आहे. स्थायी समितीचे सदस्यत्व मिळवण्यासाठी इच्छुक हे नेत्यांकडे साकडे घालत आहेत.

हेही वाचा - नांदेड : जागतिक दिव्यांग दिनी बेरोजगार दिव्यांगांनी काळा दिवस पाळत केला जिल्हा प्रशासनाचा निषेध -

सभापतीपदासाठी यांची फिल्डींग

महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत स्थायी समितीवरील आठ सदस्यांची नावे घोषित होणार आहेत. हे सर्व सदस्य काँग्रेसचे राहणार आहेत. त्यामुळे सर्वसाधारण सभेतील बंद लिफाफ्यात आपले नाव यावे याबाबत प्रयत्न करत आहेत. स्थायी समिती प्रदेश मिळाल्यानंतर सभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. सभापतीपदासाठी माजी सभापती किशोर स्वामी, प्रशांत तिडके इच्छुक आहेत. तर विद्यमान सभापती अमितसिंह तेहराही आपल्याला कोरोना काळात काम करता आले नाही. त्यामुळे पुन्हा संधी मिळावी यासाठी आग्रही आहे.

हे आहेत सदस्य आघाडीवर 

नविन सदस्य पदासाठी नगरसेविका संगीता डक, महेंद्र पिंपळे, गीतांजली हटकर, कौशल्या पुरी, ज्योती कदम, परवीन सुलताना, रेहाना बेगम चांद कुरेशी, सुनंदा पाटील यांची नावे सदस्य पदासाठी पुढे येत आहेत. स्थायी समितीच्या आठ नव्या सदस्यांची निवड विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच म्हणजे एक डिसेंबरपूर्वी होणे गरजेचे होते. मात्र सर्वसाधारण सभा झाली नसल्याने ही निवड करता आली नाही. आचारसंहितेचे कारण देत सभा झाली नसली तरी यापूर्वी आचारसंहिता कालावधीत सदस्य निवडीसाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा झाल्याचा इतिहास आहे. यावेळी मात्र कार्यकाळ संपल्यानंतर सदस्यांची निवड होत आहे ही उल्लेखनीय बाब आहे. आगामी सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Fielding of many to go for NMC status, attention to the upcoming general meeting nanded news