
Nanded Crime News: फायनान्स एजंटला लुटणाऱ्या तीन आरोपींना केले जेरबंद
मारतळा : लोहा तालुक्यातील कापसी ते मारतळा मार्गावर ता. तीन ऑगस्ट रोजी एका फायनान्स एजंटला भरदिवसा लुटणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि उस्माननगर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (ता. १४) अटक केली असून त्यांना पुढील तपाससाठी उस्माननगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कापसी - मारतळा रस्त्यावर सोमान फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एजंट गोपाळ गंगाधर मुरशेटवार हे आपल्या लाभार्थ्यांची वसुली करून कापसी बुद्रुक येथून मारतळाकडे जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मुरशेटवार या एजंटच्या दुचाकीला लाथ मारली.
त्यात ते कोसळले. तेव्हा त्याच्या जवळील तीस हजार ७३० रुपये आणि बॅग त्याला चाकूचा धाक दाखवत मारहाण करत हिसकावून घेतले होते. त्यानंतर या एजंटने उस्माननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपीतांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीस तपास सुरू होता.
दरम्यान, एका खबऱ्यामार्फत ही माहिती नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळाली. त्यावरून उस्माननगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध मोहीम सुरू झाली. मंगळवारी (ता.१४) धोंडीबा उर्फ बबलू विठ्ठल टोम्पे (रा. पांगरी ता. नांदेड) यास ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवतात त्याने उपरोक्त गुन्ह्याची कबुली दिली. अधिक विचारपूस केली असता त्याने अन्य दोघेजण आपल्यासोबत असल्याचे सांगितले. त्यावरून नोमानखान इब्राहिम खान (रा. उमर कॉलनी, नांदेड) आणि गौतम माधव कांबळे (रा. कापसी बुद्रुक, ता. लोहा) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, खंडेराव धरणे, पोलीस उपाधीक्षक मारुती थोरात, पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उस्माननगर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती, फौजदार जसवंत सिंग, कर्मचारी प्रभू केंद्रे, शेख जावेद, मोतीराम पवार, व्यंकट गांगुलवार, गंगाधर घुगे यांनी ही कारवाई केली आहे.