नांदेड : विकासनगर गृहनिर्माण संस्थेच्या पाच विश्वस्तांचा अटकपूर्व जामीन नाकारला

प्रल्हाद कांबळे
Monday, 22 February 2021

भानुदास गणपतराव देशपांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गृहनिर्माण संस्थेतील भूखंड हस्तांतरण करताना या संस्थेचे विश्वस्त अवाजवी रक्कम घेऊन हस्तांतरण करीत आहेत.

नांदेड : शहराला लागुनच असलेल्या कौठा (जुना) विकासनगर येथील जिल्हा परिषद शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्थेतील पाच जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. एन. गौतम यांनी अटकपूर्व जामीन नाकारला आहे.

भानुदास गणपतराव देशपांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गृहनिर्माण संस्थेतील भूखंड हस्तांतरण करताना या संस्थेचे विश्वस्त अवाजवी रक्कम घेऊन हस्तांतरण करीत आहेत. त्या तक्रारीमध्ये जवळपास दहा लोकांची नावे आरोपी म्हणून आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास नांदेड ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक असद शेख यांच्याकडे आहे.

या प्रकरणातील राम मनमतआप्पा पत्रे (वय 70), आनंद भगवानदास (वय 49), सुमन रामराव शिंदे (वय 45) यांनी अटकपूर्व जामीन अर्ज क्रमांक 702/2020 दाखल केला. तसेच अरविंद दत्तात्रय बिडवई (वय 73) आणि रविंद्र रामचंद्र पेंटरवाड (वय 51) यांनी अटकपूर्व जामीन अर्ज क्रमांक 669/2020 दाखल केला. 

या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. एन. गौतम यांच्यासमक्ष झाली. या प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाली तर त्यांच्या ताब्यात असलेले प्रक्रिया पुस्तक, रोख पुस्तक पावती पुस्तक आणि संस्थेची उपविधी जप्त करणे शक्य होणार नाही. यासाठी त्यांना जामीन देण्यात येऊ नये असा युक्तिवाद सरकारी वकील रणजित देशमुख यांनी मांडला. या युक्तिवादाला ग्राह्य मानून न्यायाधीश गौतम यांनी जिल्हा परिषद शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे पाच विश्वस्त यांनी मागितलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Five trustees of Vikasnagar Housing Society denied pre-arrest bail