नांदेड - बसस्थानकाला नामफलकाचा विसर

Nanded News
Nanded News

नांदेड - प्रत्येक शहराची ओळख त्या-त्या गावातील अंतर्गत रस्ते, बसस्थानक, रेल्वेस्थानक या सारख्‍या महत्वाच्या ठिकाणावरुन होत असते. अशीच एक वेगळी ओळख नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानकाची सध्या झाली आहे. नाव नसलेले बसस्थानक म्हणून ते नावारुपाला येत आहे. केवळ बसच्या चालकासह वाहकालाच बसस्थानकाचा रस्ता माहिती आहे, इथे परजिल्ह्यातून पहिल्यांदाच आलेल्या प्रवाशावर कोणते गाव किंवा बसस्थानक आले हे विचारण्याची वेळ फलक नसल्यामुळे आली आहे.
 
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मध्यवर्ती ठिकाणी बसस्थानक दुमजली इमारतीत आहे. मात्र बस्थानक परिसरात कुठेही बसस्थानकाच्या अथवा शहराच्या नावाचे फलक दिसत नाही. स्थानकावर नाव नसल्याने बाहेर गावच्या प्रवाशांना आणि नवख्या बस चालकास बसस्थानक कुठे आहे, यासाठी विचारपुस करावी लागते. नाव नसलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. 

बसस्थानकाची दुरावस्था झाली 

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बसस्थानक असले तरी शिवाजीनगर ते कलामंदिर असा ओव्हरब्रिज झाल्यापासून बसस्थानक परिसर पूर्णपणे झाकुन गेला आहे. यातच बसस्थानकाच्या आजुबाजुने मोठ - मोठी जाहिरात होल्डींग लावण्यात आल्याने देखील बसस्थानकाची ओळख हरवून गेली आहे. त्यामुळे ओव्हरब्रिजवरुन जाणाऱ्या प्रवाशांना देखील बसस्थानकासमोरुन जाताना देखील पत्ता लागत नाही. काही महिण्यापूर्वी बसस्थानातील इमारतीवर ‘नांदेड शहर मध्यवर्ती बसस्थानक’ नावाचा मोठा बोर्ड दिसत होता. त्यामुळे बाहेर गावाहून आलेल्या प्रवाशांना बसस्थानक शोधण्यासाठी विचारपूस करावी लागत नव्हती. मात्र, काही दिवसांपासून जिल्हा मध्यवर्ती बसस्थानकावरील प्रशासनाकडून पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने बसस्थानकाची चांगलीच दुरावस्था झाली आहे. - (क्रमशः) 

प्रवासी पडतात बुचकळ्यात ः 

बसस्थानकात गाड्या थांबण्याच्या ठिकाणी फलाट क्रमांक आणि प्रत्येक गावांची नावे स्पष्ट आणि ठळक अक्षरात बोर्डावर लावल्यास अगदी ज्येष्ठ नागरिकांना देखील बस थांबणाऱ्या नेमक्या ठिकाणी थांबणे सोईचे होते. मात्र, अख्या बसस्थानकात केवळ एक ते दोन ठिकाणीच अंधुक, भुरकट अक्षरात साईन बोर्डावर फलाट क्रमांक व गावांच्या नावाची यादी असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रवाशांना देखील गाडी कुठे येणार, थांबायचे कुठे याची कल्पना येत नाही. दुसरीकडे बाहेरच्या जिल्ह्यातील व राज्यातील बसचालकांना देखील गाडी नेमक्या कोणत्या फलकावर थांबवायची या विषयी संभ्रमावस्था निर्माण होते. वेळेत बसगाड्या बाहेर पडत नसल्याने अनेक गाड्या अस्ताव्यस्तपणे उभ्या केल्या जातात. त्यामुळे बसस्थानकात विनाकारण गर्दी दिसून येते. 

वेळापत्रक दर्शनी भागात दिसेना ः

एकीकडे बसस्थानकाच्या स्वच्छतेसाठी खासगी कंपनीला कोट्यावधीचे टेंडर दिले जाते. दुसरीकडे मात्र बसस्थानकातून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या बसचे अद्यावत वेळापत्रक दर्शनी ठिकाणी लावले जात नाही. फलाटावर गावांच्या नावांची यादी लावली जात नाहीत. 

लवकरच नव्याने बोर्ड बसविण्यात येतील
गावांच्या नावांच्या पाट्या खराब झाल्या होत्या. काही ठिकाणी पाट्या लोंबळत होत्या. त्यामुळे प्रवाशांना इजा पोहचू नये म्हणून बोर्ड काढण्यात आले आहेत. लवकरच त्या पुन्हा नव्याने बसविण्यात येतील. 
- अविनाश कचरे, विभागीय नियंत्रक अधिकारी, नांदेड. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com