नांदेड : दयानंद वनंजे आत्महत्याप्रकरणी हरियाणातील चार जणांवर गुन्हा दाखल

प्रल्हाद कांबळे
Saturday, 3 October 2020

पोलिसांनी घटनास्थळावरुन दुचाकी व अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या बाजूलाच पडलेली सुसाईड नोट जप्त केली होती. मात्र या प्रकरणी तब्बल २७ दिवसांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात हरियाना येथील सोनिपतमध्ये राहणाऱ्या चार जणांवर शुक्रवारी (ता. दोन) आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : तरोडा (बु) परिसरातील प्रकाशनगर भागात राहणाऱ्या आणि नेहमी मोठ्या राजकीय मंडळींच्या संपर्कातील दयानंद म्हणजे त्यांनी जाळून घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना ता. पाच सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती. पोलिसांनी घटनास्थळावरुन दुचाकी व अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या बाजूलाच पडलेली सुसाईड नोट जप्त केली होती. मात्र या प्रकरणी तब्बल २७ दिवसांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात हरियाना येथील सोनिपतमध्ये राहणाऱ्या चार जणांवर शुक्रवारी (ता. दोन) आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दयानंद वनंजे जळीत प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर आता त्यांच्या मुलीच्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दयानंद वनंजे यांना हरियानामधील सोनिपत येथे राहणारे रॉबिन बरेजा, गौरव बरेजा, पारू बरेजा आणि प्रिया बरेजा यांनी व्यवसायात भागीदार म्हणून घेतले होते. त्यानंतर श्री. वनंज यांची फसवणुक करत खोटे दस्तावेज तयार करून त्यांनी कंपनीच्या नावावर रक्कम घेऊन शासनाच्या लोगोचा वापर करण्यास सुरुवात केली. ही माहिती श्री. वनंजे यांना मिळाल्यानंतर त्यांनी याबाबत भागिदार असलेल्या श्री. बरेजा यांना विचारपुस केली. यावेळी त्यांनाच धमकावण्यात आले होते. याबाबत वनंज यांनी तक्रार केल्यानंतर त्यांना मारहाण करून त्यांच्यावरच खोटे गुन्हे नोंदविण्यात आले होते. या त्रासाला कंटाळून दयानंद वनंजे यांनी जाळून घेऊन आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद केले होते. 

हेही वाचा -  कांद्याचे भाव वधारल्याने ” ये रे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या” असे म्हणण्याची वेळ

हे आहेत मृत्यूस कारणीभूत

मात्र प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर त्यांच्या मुलीने भाग्यनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन रॉबिन बरेजा, गौरव बरेजा, पारू बरेजा आणि प्रिया बरेजा यांच्याविरुद्ध फसवणुक, आत्महत्या करण्यास परावृत्त यासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल भोसले करत आहेत. लवकरच सोनिपत येथे आरोपीला अटक करण्यासाठी एक पथक रवाना करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

येथे क्लिक करा - गरीबांपासून चमचमणारी स्क्रीन आहे चंद्राप्रमाणेच दूर -

२७ दिवसानंतर गुन्हा दाखल 

बंद असलेली दारू दुकाने सुरू करून देण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि बड्या व्यावसायिकांमध्ये मध्यस्थी करणाऱ्या आणि नेहमी राजकीय वर्तुळात असलेल्या दयानंद वनंजे यांचा अर्धवट जळालेला मृत्तदेह मालेगाव रस्त्यावर ता. पाच सप्टेंबर रोजी आढळला होता. यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरुन एक सुसाईड नोट जप्त केली होती. मात्र तब्बल २७ दिवसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Four persons from Haryana have been booked in connection with Dayanand Vananje suicide case nanded news