
जिल्ह्यातील व शहरातील फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर व संबंध ठाणेदारांना दिल्या.
नांदेड : जिल्ह्यात वेगवेगळ्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या व १४ वर्षापासून फरार असलेल्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तसेच शिवाजीनगर पोलिसांनी एका आरोपीला अटक करुन त्याच्याकडून खंजर व दुचाकी जप्त केली. या दोन्ही कारवाया ता. २२ नोव्हेंबरच्या रात्री करण्यात आल्या.
जिल्ह्यातील व शहरातील फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर व संबंध ठाणेदारांना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहराच्या वेगवेगळ्या भागात गस्त घालून एका चौदा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक केले. अटक केलेल्या आरोपीवर माळाकोळी पोलीस ठाण्यात एक गंभीर गुन्हा दाखल होता. विनायक प्रकाश शिंदे राहणार सलगरा, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर असे त्याचे नाव असून तो मूळगावी आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यावरुन पथकातील पोलिस हवालदार गुंडेराव करले यांनी ही माहिती पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना दिली. यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक शिंदे यास अटक करुन माळाकोळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
येथे क्लिक करा - नांदेड : इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा दोन डिसेंबरपासून सुरु होणार -
शिवाजीनगर पोलिसांनी खंजर बाळगणाऱ्या युवकास केली अटक
शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहुळे हे आपले सहकारी विशाल अटकोरे यांना सोबत घेऊन ता. २२ नोव्हेंबर रोजी आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी आंबेडकरनगर भागात हातात खंजीर घेऊन दहशत पसरवणारा दीपक उर्फ सोनू जगबीरसिंग भाटिया (वय २३) राहणार काळेश्वरनगर, विष्णुपूरी यास अटक केली. त्याच्याकडून एक लोखंडी खंजर व दुचाकी असा ऐवज जप्त करुन त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार गणेश कानगुनवार व भानुदास आडे करत आहेत. या दोन्ही पथकाचे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे आणि पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर व अनंत नरुटे यांनी कौतुक केले आहे.