
. दिवसेंदिवस ग्रामीण भागात शेतीसाठी ट्रॅक्टरसह आधुनिक यांत्रिक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांसह अल्प भूधारक शेतकऱ्यांना शेती उपयोगी जनावरे पाळणे कठीण झाले आहे.
शिवणी (जिल्हा नांदेड) : ग्रामीण भागात पूर्वी शेतीसोबत पाळीव जनावरे मोठ्या प्रमाणात प्रत्येक शेतकऱ्याकडे असायची. दिवसेंदिवस ग्रामीण भागात शेतीसाठी ट्रॅक्टरसह आधुनिक यांत्रिक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांसह अल्प भूधारक शेतकऱ्यांना शेती उपयोगी जनावरे पाळणे कठीण झाले आहे.
पुर्वी शेतकऱ्यांकडे पडीक जमीन असायची. त्यामुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्याकडे नसायचा. पूर्वी ज्वारीची पिकेही शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत असत. कालांतराने ज्वारीचे पीकही कमी झाले. परिणामी खेडोपाडी ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी एकेकाळी महत्त्वाचा घटक असणारा गोबरगॅस आज कालबाह्य झाला आहे.
भारत हा कृषिप्रधान देश म्हणून जगात ओळखला जातो. कारण भारतात 75 टक्के नागरिक शेती व्यवसाय करतात. पुर्वी घरोघरी बैलजोडी. गायी. म्हशी, शेळ्या. मेंढ्या अशी दुधाळ जनावरे मोठ्या प्रमाणात पाळली जात होती. शेतीसोबत दुग्ध व्यवसायासाठी या पाळीव प्राण्यांचा उपयोग होत असे. ज्यांच्याकडे पाळीव जनावरे होती त्या प्रत्येकाकडे हमखास अनुदानातून किंवा खाजगी खर्चातून गोबर गॅस संयंत्र बसविण्यात आली होती. या गोबर गॅसमुळे स्वयंपाकासाठी धूर विरहित गॅसमुळे प्रदूषण रोखण्यास मदत तसेच झटपट स्वयंपाक करता येत होता. त्यातून निघणाऱ्या शेनकुटापासुन नैसर्गिक सेंद्रिय शेती होत होती. मात्र आता दिवसेंदिवस शेतीच्या आधुनिकरणात शेतकऱ्या जवळील पशुधन कमी झाल्याने ग्रामीण भागातील गोबरगॅस कालबाह्य झाल्याचे दिसून येत आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे