नांदेड : कुडाच्या भिंती, लिपायला माती अन् शेण, त्यावर लिहिलं अक्षराचं लेणं 

स्मिता कानिंदे
Wednesday, 9 September 2020

सध्या संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असताना शिक्षण विभागाने ‘शाळा बंद शिक्षण सुरू’ हा ऑनलाइन-ऑफलाइन उपक्रम सुरू केला; परंतु आजही ग्रामीण भागात ब­ऱ्याचशा पालकांकडे स्मार्ट फोन नाही.

गोकुंदा (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील अतिमागास आदिवासीबहुल गावात ताटव्या कुडाची घरं, त्या कुडाला शेणामातीचं लिंपण देऊन सारवलेलं. ना येथे आरसीसी घरं, ना गिलाव्याच्या चोपड्या भिंती. मग मुलांना घरच्या घरी अभ्यास द्यायचा तरी कसा? मग येथील शिक्षकांनी नवी युक्ती लढवली. शेणामातीनं सारवलेल्या कुडाच्या भिंतीवर अक्षरांचं लेणं लिहून चिमुकल्या लेकरांना दिलं अभ्यासाचं देणं. 

सध्या संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असताना शिक्षण विभागाने ‘शाळा बंद शिक्षण सुरू’ हा ऑनलाइन-ऑफलाइन उपक्रम सुरू केला; परंतु आजही ग्रामीण भागात ब­ऱ्याचशा पालकांकडे स्मार्ट फोन नाही. ज्यांच्याकडे आहे तेथे कव्हरेजची अडचण आहे. या सर्व अडचणीवर मात करीत जिल्हा परिषद शाळा दिगडी (मं.) केंद्र-मांडवा येथील उपक्रमशील शिक्षक प्रसन्न धात्रक हे या उपक्रमांतर्गत गृहभेटी देऊन विद्यार्थ्यांना घराच्या बाहेर त्यांच्या सोयीनुसार कुडाच्या शेणा-मातीने माखलेल्या भिंतीवर तर कुठे रिकाम्या पत्र्यावर अक्षर, संख्या, शब्द व इंग्रजी मुळाक्षरे देऊन विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेत आहेत. 

हेही वाचा ऐकावे ते नवलच : चक्क ‘या’ गावात गाय आणि म्हैस पाळत नाहीत -

गावकऱ्यांनी दोन्ही शिक्षकांचे कौतुक केले

मंदिराच्या पारावर त्यांनी स्वत: फरशी रेखाटन करून विद्यार्थ्यांना अभ्यास दिला. मुले हवे तेव्हा जाऊन मास्क व सामाजिक अंतर यांचे भान ठेवून शिकत आहेत. अशा मुलांसाठी हा उपक्रम स्तुत्य आहे. गावकऱ्यांनी दोन्ही शिक्षकांचे कौतुक केले. त्याचबरोबर शिक्षकांनी स्वखर्चातून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना उजळणी पुस्तकाचे वाटप केले. भिंत तेथे फळा हा उपक्रम राबवून दुर्लक्षित भिंती, पत्र्याचे टीनशेड, निरुपयोगी बॅनर याचा उपयोग लिहिण्यासाठी सुंदर प्रकारे केला. या कामी त्यांना सहशिक्षक संदीप इंगोले, केंद्रीय मुख्याध्यापक गोवर्धन मुंडे, केंद्रप्रमुख बी. व्ही. थगनारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमाबद्दल गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, शिक्षण विस्तार अधिकारी नाना पांचाळ, सरपंच व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

अशापध्दतीने शिक्षण देणे सध्या तरी काळाची गरज

शिक्षण क्षेत्रात अशा पद्धातीने ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण दिले तर त्यांना याचा नक्कीच फायदा होण्यास मदत होईल. भिंतीवर लिहिलेली अक्षर किंवा अंक हे नेहमी आपल्या डोळ्यासमोर राहतात. कुठलीही वस्तु डोळ्यासमोर राहिल्यास ती लक्षात बसते. त्यामुळे अशापध्दतीने शिक्षण देणे सध्या तरी काळाची गरज निर्माण झाली आहे. 

संपादन- प्रल्हाद कांबळे

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Garbage walls, clay to cover and dung, letter cave written on it nanded news