esakal | नांदेड : घरकुल लाभार्थ्यांनी भिंती बांधल्या, पण छताचे काय ? तुटपुंज्या निधीमुळे स्वप्न अपूर्णच

बोलून बातमी शोधा

house
नांदेड : घरकुल लाभार्थ्यांनी भिंती बांधल्या, पण छताचे काय ? तुटपुंज्या निधीमुळे स्वप्न अपूर्णच
sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड ः प्रत्येकाला स्वतःचे घर असावे यासाठी शासनाच्या वतीने दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या नागरिकांसाठी घरकुल योजना आमलात आणली. मात्र, सध्या वाढलेली महागाई पाहता घराच्या स्वप्नाला कुठेतरी तडा जात असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे. घरकुल बांधकामासाठी दिल्या जाणारे अनुदान तुटपुंजे असल्याचे घरकुल लाभार्थ्यांचे म्हणने असल्याने शासनाने ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे अनुदान वाढवून देण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.

शासनाकडून ग्रामीण भागात पंचायत समिती स्तरावरुन दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या, तसेच एक लाख रुपयांच्या आत उत्पन्न असणाऱ्या नागरिकासाठी पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजना आदिवासी विकास प्रकल्प विभागाअंतर्गत शबरी घरकुल योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी शासनाकडून एक लाख २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. मात्र, अलीकडच्या काळात बांधकाम साहित्यात प्रचंड वाढ झाली आहे. विटा, रेती, सिमेंट, मजुरांची मजुरी यांच्या दरात झालेली वाढ ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

हेही वाचा - हिंगोलीत विनाकारण फिरणाऱ्या १०४ जणांच्या तपासणीत पाच पॅाझिटीव्ह

त्यामुळे शासनाकडून मिळणारे तुटपुंजे अनुदान आणि त्यात वेळेवर अनुदानाची रक्कम मिळत नसल्याने घर कसे बांधावे? असा मोठा प्रश्‍न लाभार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. जिल्ह्यात घरकुलाचे बांधकाम रखडले असल्याने भिंती बांधल्या मात्र छताचे काय? असा प्रश्‍न लाभार्थी उपस्थित करीत असल्याने सर्वसामान्यांचे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण राहत आहे. अनेक लाभार्थ्याचे घरकुले पूर्ण न झाल्याने त्यांचा संसार उघड्यावर सुरु आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. शासनाने घरकुलाच्या निधीत भरीव वाढ करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांकडून केल्या जात आहे.

शासनाकडून घरकुल बांधण्याकरिता विविध योजनेतून एक लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिल्या जाते. मात्र, सध्याची वाढलेली महागाई पाहता मिळणाऱ्या तुटपुंज्या अनुदानात घर बांधणे अशक्य आहे. त्यामुळे शासनाने गोरगरिबांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनुदान वाढवून द्यावे.

- रामराव बाभळेकर ( लाभार्थी )

अलीकडच्या काळात विटा, सिमेंट, रेती आदी बांधकाम साहित्यात झालेली वाढ आणि मजुरांची मजुरी सर्व सामान्य नागरिकांच्या आवाक्य बाहेर आहे. त्यामुळे शासनाने विविध घरकुल योजनाच्या अनुदानात वाढ करुन द्यावी. जनेकरुन घरकुलाचे बांधकाम करता येईल.

- शेख चांद शेख पाशा ( लाभार्थी )

संपादन- प्रल्हाद कांबळे