Nanded : साईप्रसादच्या दातृत्वाने वंचितांची दिवाळी गोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded govt hospital

Nanded : साईप्रसादच्या दातृत्वाने वंचितांची दिवाळी गोड

नांदेड : सामाजिक कार्यात राज्यभरात नावाजलेल्या साईप्रसादकडून विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात गेल्या पाच वर्षांपासून दररोज दोन वेळचे जेवण देण्यात येत आहे. कोणताही चेहरा नसलेल्या दातृत्वाने जिल्ह्यात अनेकांचे मोडलेले संसार पुन्हा उभे केले आहेत. आता दिवाळीतही वंचितांचे तोंड गोड व्हावे, या उद्देशाने शासकीय रुग्णालयात रुग्ण व नातेवाईकांसाठी मिष्टान्न भोजनाची व्यवस्था केली.

रविवारी दीड हजार जणांना दिवाळीचा फराळ देण्यात आला. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे सोमवारी (ता.२४) पुरणपोळीचे जेवण देण्यात आले. साईप्रसाद ही दोन हजारांवर दानशूरांची संघटना आहे. यामध्ये देशासह विदेशातील अनेक जण भरभरून मदत करतात. विशेष म्हणजे यातील कुणीही ती मदत करताना प्रत्यक्ष समोर येत नाही.

दरवर्षी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात असलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दिवाळीच्या काळात गोडधोड देण्याची परंपरा साईप्रसादने यंदाही सुरु ठेवली आहे. सोमवार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुरणपोळीचे जेवण देण्यात आले. पाडव्यालाही मिष्टान्न भोजन असणार आहे. तसेच २७ आॅक्टोबर रोजी बाभळी या गावात सैनिक गौरव सोहळा घेण्यात येणार आहे. यामध्ये सैन्यातील जवान आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती ऋण व्यक्त केले जाते.

स्वामी समर्थ मंदिराचाही उपक्रम

सोमेश काॅलनी येथील श्री स्वामी समर्थ मंदिर संस्थानही सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहते. यंदा मंदिराच्या वतीने दिवाळीत एक किलो मिठाईचे डबे तयार करण्यात आले आहेत. या मिठाईचे शहारातील गरीब कुटुंबांना वाटप केले जाणार आहे. मंदिराकडून शासकीय रुग्णालयांतही जेवण देण्यात येते.

फराळ गरीबांच्या दारी पोहचणार

तिरंगा परिवाराच्या वतीने दिवाळीनिमित्त गोरगरीब कुटुंबांना घरपोच दिवाळी फराळ पोहोचविण्यात येतो. यंदाही तिरंगा परिवाराने त्या दृष्टीने तयारी केली आहे. तसेच दानोत्सव साजरा केला जातो. यंदा या दानोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी नवीन कपडे दान म्हणून दिले आहेत.