esakal | नांदेडला ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का...नव्यांना संधी... 
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड - ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सोमवारी मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. 

नांदेड जिल्ह्यातील मुदत संपलेल्या एक हजार १५ ग्रामपंचायतीपैकी १०६ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या होत्या. तर दोन ग्रामपंचायतीची निवडणुक रद्द झाली होती. त्यामुळे ९०७ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता. १५) मतदान झाले. त्यानंतर सोमवारी (ता. १८) मतमोजणी झाली. नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. त्यामुळे चुरशीच्या लढती झाल्या. निकाल जाहीर झाल्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत विजयी उमेदवारांसह जल्लोष केला. 

नांदेडला ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का...नव्यांना संधी... 

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची सोमवारी (ता. १८) मतमोजणी झाल्यानंतर मतपेटीतून अनेक धक्कादायक निकाल बाहेर आले. त्यात अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्के देत मतदारांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. अनेक मातब्बरांना पराभवाला सामोरे जावे लागले. अनेक ग्रामपंचायतीमध्ये काट्याची लढत झाली. थोड्या फार मतांनी पराभवाला सामोरे जाणाऱ्यांची संख्याही यंदा अधिक होती. 

नांदेड जिल्ह्यातील मुदत संपलेल्या एक हजार १५ ग्रामपंचायतीपैकी १०६ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या होत्या. तर दोन ग्रामपंचायतीची निवडणुक रद्द झाली होती. त्यामुळे ९०७ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता. १५) मतदान झाले. त्यानंतर सोमवारी (ता. १८) मतमोजणी झाली. जिल्ह्यातील दोन हजार ९१३ मतदान केंद्रावर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १३ लाख २१ हजार १४७ मतदारांपैकी १० लाख ७८ हजार ११८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाची टक्केवारी ८१.६२ टक्के झाली होती. मतमोजणीची प्रक्रिया तालुक्याच्या ठिकाणी सोमवारी पार पडली. मतमोजणी दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी नांदेडसह मुखेड तालुक्यात जाऊन पाहणी केली. मतमोजणीसाठी उपजिल्हाधिकारी शरद मंडलीक यांच्यासह इतर उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांनी तसेच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. 

हेही वाचा - माहूरमध्ये दहापैकी सात ठिकाणी प्रस्थापितांना धक्का; वाई बाजार गटात शिवसेनेचे पानिपत

विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा जल्लोष
कोरोना संसर्गाच्या काळात निवडणुका झाल्यामुळे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले होते. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. त्यामुळे चुरशीच्या लढती झाल्या. निकाल जाहीर झाल्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत विजयी उमेदवारांसह जल्लोष केला. 


नेतेमंडळींचे दावे - प्रतिदावे 
ग्रामपंचायत निवडणुका या पक्षविरहित असल्यामुळे स्थानिक आघाड्यांवर नेतेमंडळींचे लक्ष होते. निकाल लागल्यानंतर आता नेतेमंडळी दावे - प्रतिदावे करू लागले आहेत. मात्र, असे असले तरी येत्या दोन चार दिवसात कोणी किती जागांवर बाजी मारली, याचे चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या समर्थकांनी कंधार आणि लोहा तालुक्यात बऱ्यापैकी यश मिळवल्याचे दिसून येते तर दुसरीकडे विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे, ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे, वंचितचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांच्या समर्थक पॅनेलला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर तसेच कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे यांना एकहाती सत्ता मिळाली आहे. हदगाव तालुक्यात महाविकास आघाडीचा प्रयोग बऱ्यापैकी यशस्वी झाला असला तरी बाबूराव कदम यांच्या समर्थकांनीही अनेक ठिकाणी बाजी मारली आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - Motivational Story : नांदेड जिल्ह्यातील बहिणी- बहिणीची शेती !

काँग्रेसच्या धोरणांचा विजय - अशोक चव्हाण 
नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस आणि काँग्रेसशी निगडित पॅनलला मिळालेला विजय हा काँग्रेसच्या सर्वसमावेशक व विकासात्मक धोरणांचा विजय असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी म्हटले आहे. श्री. चव्हाण म्हणाले की, डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. तीच परंपरा कायम ठेवून या मतदारसंघाने तिन्ही तालुके मिळून १५१ पैकी १२४ ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस आणि काँग्रेसच्या विचारधारेशी निगडित पॅनल निवडून दिली आहेत. काँग्रेसवर दर्शवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी असून, हे निकाल पुढील काळात अधिकाधिक विकासकामे करण्यासाठी बळ देणारे ठरतील. दरम्यान, भोकर तालुक्यातील ६० पैकी ५०, मुदखेडमधील ४५ पैकी ३७ आणि अर्धापूर तालुक्यातील ४३ पैकी ३७ ग्रामपंचायतींवर कॉँग्रेसचे पॅनेल विजयी झाल्याचा दावा कॉँग्रेसचे महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर यांनी केला आहे. 

धक्कादायक निकाल 
अर्धापुर तालुक्यामध्ये धक्कादायक निकाल लागले आहेत. या ठिकाणी स्थानिक आघाड्यांची सरशी झाली आहे. मुदखेड तालुक्यातील बारडच्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष (कै.) शंकरराव बारडकर यांचे चिरंजीव शिवसेनेचे बाळासाहेब देशमुख बारडकर यांच्या पॅनेलची सत्ता आली आहे. नायगाव तालुक्यात प्रस्थापितांच्या विरोधात मतदारांचा कौल अनेक ठिकाणी मिळाला आहे. आमदार राम पाटील रातोळीकर, श्रावण भिलवंडे, संजय बियाणी, वसंत सुगावे आदींना सत्ता टिकवण्यात यश आले आहे. माहूरमध्ये प्रस्थापितांना धक्का बसला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस शेषराव चव्हाण यांच्या पॕनलने चव्हाणवाडी ग्रामपंचायतवर काँग्रेसची सत्ता आणली आहे 

नांदेडच्या ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

आमदारांचेही होते लक्ष 
आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना अंतापूरमध्ये धक्का बसला तर आमदार राजेश पवार यांच्या अलूवडगाव ग्रामपंचायतीत त्यांच्या समर्थकांना केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. आमदार मोहन हंबर्डे यांनी विष्णुपुरीत वर्चस्व मिळवले आहे तसेच आमदार राम पाटील रातोळीकर यांनीही रातोळीत यश मिळवले आहे. आमदार माधव पाटील जवळगावकर यांनीही बऱ्यापैकी यश मिळवले आहे.