Nanded : ग्रामपंचायत निवडणुकीचा फड लागला रंगू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Grampanchayat Elections

Nanded : ग्रामपंचायत निवडणुकीचा फड लागला रंगू

नांदेड : निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच ग्रामीण भागात बैठकांनी जोर पकडला आहे. या वेळेस सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेमधून होत आहे. त्यामुळे प्रचार करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे.

सध्या गावागावात जो तो निवडणुकीच्या गोष्टी करू लागला आहे. ज्या व्यक्तीला कधी कोणी बोलायचे नाही, त्या व्यक्तीला उमेदवार मोठ्या आदराने विचारपूस करत आहेत. अनेकांच्या घरी जाऊन उमेदवार प्रचार करत आहेत की, ‘भाऊ तुमच्यामुळे सरपंच पदासाठी उभा राहतो बरं’.

अनेक लोकांना निवडणुकीच्या योगाने का होईना मानसन्मान मिळत आहेत. अनेक लोक गावातील चौकाचौकात चावडीवर बसून उमेदवारांचे भविष्य ठरवत आहेत. थेट जनतेतून निवडणूक असल्यामुळे उमेदवाराला गावातील लोकांचा जेवणाचा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे पैशाची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी होत असल्याचे चित्र आहे. अनेकांनी आपापल्या मतदारांची यादी, मतदारांची नावे व मतदार यादी जुळवाजुळव करण्याची तयारी सुरु केली आहे.

मतदारांना आणणे अवघड

दिवाळी होताच अनेक गावातील लोक काम धंद्यासाठी पुणे, मुंबई, हैदराबाद, औरंगाबाद, नागपूर अशा मोठ्या शहराच्या ठिकाणी गेले आहेत. या लोकांना आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. बाहेरगावाहून जे कोणी या लोकांना आणेल तो नक्कीच आघाडी घेईल, अशा प्रकारच्या चर्चा चावडीवर रंगू लागल्या आहेत.

या वेळेची निवडणूक थेट जनतेतून होत असल्यामुळे अनेक रथी, महारथी रिंगणात उतरणार आहेत. लाखो रुपये खर्च करून काही ओल्या पार्ट्या देऊन लोकांना खुश करतीलही. परंतु, उमेदवाराचे भविष्य मतदार राजाच्या हाती आहे. सरपंच हा शेवटी मतदानाच्या पेटीतूनच ठरणार आहे.

- शैलेश हंबर्डे, सोनखेड.

ज्या उमेदवाराने खाऊ, पिऊ घातले त्याचे खाऊ तसेच ज्याने काही दिले त्याचेही घेऊ. मात्र, मतदान हे पुढील पाच वर्ष गावाचा विकास जो करेल त्यालाच देऊ.

- वामनराव गोराडे पाटील, पुयणी.