नांदेड : बळीरामपूर येथील ग्रामसेवक गोविंद माचनवाड लाचेच्या जाळ्यात

प्रल्हाद कांबळे
Monday, 10 August 2020

लाचखोर ग्रामसेवक गोविंद माचनवाड हा सोमवारी (ता. १०) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.

नांदेड : पाणी प्लांट टाकण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी आठ हजाराची लाच स्विकरणारा लाचखोर ग्रामसेवक गोविंद माचनवाड हा सोमवारी (ता. १०) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. त्याच्याविरुद्ध नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बळीरामपूर (ता. नांदेड) येथील ग्रामपंचायत अंतर्गत राहणाऱ्या एका नागरिकाला पाणी प्लांट टाकायचा आहे. त्यासाठी त्याने सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करुन ग्रामंचायतचे नाहरकत प्रमाणपत्रासाठी तो ग्रमपंचायत कार्यालयात गेला. आपली फाईल ग्रामसेवक गोविंद माचनवाड यांच्या टेबलवर ठेवली. त्यानंतर आपले नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे अशी अर्जाद्वारे मागणी केली.

हेही वाचा बापरे...! विवाहितेच्या अंगावर टाकले उकळते गोडतेल

पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा
 
मात्र हे प्रमाणपत्र देण्यासाठी लाचखोर ग्रामसेवक श्री. माचनवाड याने तक्रारदाराला १० हजाराची लाच मागितली. तडजोडअंती ही लाच आठ हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने ता. सहा आॅगस्ट रोजी नांदेड येथे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांनी आपल्या पथकामार्फत लाच मागणी पडताळणी सापळा लावला. यात आठ हजार रुपये घेण्याची कबुली सरकारी पंचासमक्ष निष्पन्न झाले.

आठ हजाराची लाच घेताना अडकला

यानंतर पोलिस निरीक्षक शेषेराव नितनवरे यांनी पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील. पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सहकारी हनमंत बोरकर, किशन चिंतोरे, एकनाथ गंगातिर्थ, नरेंद्र बोडके, अनिल कदम यांना सोबत घेऊन सिडको परिसरातील एसबीआय बँक संभाजी चौकात लावलेल्या सापळ्यात ग्रामसेवक गोविंद माचनवाड (वय ४०) रा. सुनीलनगर, बळीरामपूर, नांदेड हा रंगेहात आठ हजाराची लाच घेताना अडकला. शेषेराव नितनवरे यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Gramsevak from Balirampur caught in bribery nanded news