
नांदेड : वानखेडेंच्या प्रवेशाने शिवसैनिकांत नवचैतन्य
हदगाव : हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाने हदगाव, हिमायतनगरसह हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. जुन्या शिवसैनिकांसह वानखेडेंच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पक्ष प्रवेशानंतर हदगावच्या मातोश्री वर कार्यकर्त्यांची गर्दी वाढली आहे.
वानखेडे यांनी नुकताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून प्रवेश केला. १९९० पासून हदगाव मतदारसंघात काम करत असून सतत पंधरा वर्षे आमदार व पाच वर्षे खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. पक्षाने त्यांची ''मराठवाडा प्रतोद'' म्हणूनही नेमणूक केली होती. त्यांच्या मागील वीस वर्षे सत्तेच्या काळात हदगाव नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती आदी स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांनी सत्ता स्थापन केली होती.
मतदारसंघातील दिग्गज घराणे म्हणून ओळखले जाणारे माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, आष्टीकर आणि जवळगावकर या दिग्गज नेत्यांनाही त्यांनी निवडणुकीत पराभूत केले होते. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या वरिष्ठांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी देताना आपल्या मनाप्रमाणे देण्यात आल्या नसल्याचा ठपका ठेवत वानखेडे यांनी सेनेला ''जय महाराष्ट्र'' करत भाजपाचे ''कमळ'' हाती घेतले होते. परंतु तेथेही त्यांचे मन रमले नसल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसची उमेदवारी घेत लोकसभा निवडणुकही लढविली होती. परंतु त्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे वानखेडे काही काळ शांत होते. वानखेडे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून असतानाच त्यांनी स्वगृही शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला.
कार्यकर्त्यांकडून वानखेडेंचे स्वागत
नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे आरक्षण निश्चित झाले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी वानखेडे सज्ज झाले आहेत. मतदारसंघातील या निवडणुका जिंकण्यासाठी ''टायगर इज बॅक'' झाल्याने आता या निवडणुका जिंकण्यासाठी आम्हाला अडथळा नाही, असे मतदारसंघातील शिवसैनिकांसह वानखेडे यांचे समर्थक सांगत आहेत. या निवडणुका जिंकण्यासाठी आता वानखेडेंसोबत आम्हीही सज्ज असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
Web Title: Nanded Hingoli Former Mp Subhash Wankhede Join Shiv Sena On Matoshree
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..