
नांदेड : हिवळणीला चार दिवसांपासून निर्जळी!
माहूर : तालुक्यातील ग्रामपंचायत हिवळणी येथील पाणीपुरवठ्याचे काम करणा-या कर्मचा-यांचा मागील अनेक महिन्याचा पगार थकल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंदचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण हिवळणी गाव त्रस्त झाले असून मागील चार दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने महिला व गावकऱ्यांची पाण्याअभावी हेळसांड होत आहे.
हिवळणी - पापलवाडी या गट ग्राम पंचायतीतंर्गत हिवळणी येथील नळाला पाणी सोडणा-या दोन कर्मचाऱ्यांनी पाणी सोडले नसल्यामुळे गावात मागील चार दिवसांपासून निर्जळी आहे. वेतनासाठी वारंवार ग्रामपंचायत व ग्रामसेवकास मागणी करूनही केलेल्या कामाचे वेतन मिळत नसल्याने काम बंदचा पवित्रा कर्मचा-यांनी घेतला आहे. याचा फटका ग्रामस्थांना बसला असून महिला, पुरूषांना दोन दोन किलोमिटर वरून पायपीट करावी लागत आहे.
विशेष म्हणजे पापलवाडी-हिवळणी या गट ग्रामपंचायत असलेल्या दोन्ही गावात स्वतंत्र नळयोजना अस्तित्वात आहेत. सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहीरीला देखील पाणी आहे. याबाबत गावातील अरविंद राठोड, मनिष जाधव, मनोहर आडे, राजू पवार, अविनाश जाधव, भिकू राठोड, अभिजित राठोड व अरविंद राठोड आदींनी शनिवारी सकाळी ग्रामसेवक पेंडकर यांची प्रत्यक्ष भेट घेवून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.
पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना अंदाजे दीड लाख रुपये पगार दिला गेला नसल्यामुळे काम बंद करून हिवळणी गावाला पाणीपुरवठा करणे थांबविले आहे. ग्रामपंचायतच्या खात्यात शिल्लक निधी नसल्यामुळे पगार करता येणे कठीण बनले आहे. मागील महिनाभरापासून कर वसुलीसाठी गावकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे. आज झालेल्या चर्चेअंती कर्मचाऱ्यांना पुढील चार ते पाच दिवसात पर्यायी मार्गाने पगार देण्यात येईल. संध्याकाळपासून गावाला सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल.
- ए. एच. पेंडकर, ग्रामसेवक, हिवळणी.
Web Title: Nanded Hivalani Water Scarcity For Four Days
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..