Nanded News: हायवा टिपर चोरीचे रॅकेट उघडकीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

Nanded News: हायवा टिपर चोरीचे रॅकेट उघडकीस

नांदेड : हायवा टिपर चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उलगडा केला आहे. चोरीचे सात गुन्हे उघड झाले असून पाच हायवा टिपरसह सुटे भाग आणि एक जीप असा एकूण एक कोटी दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात सात हायवा टिपर चोरीला गेल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर आणि त्यांच्या पथकाने शोध मोहिम सुरू केली.(Nanded News)

मिळालेल्या माहितीनुसार पथकाने वांगी (ता. नांदेड) येथे सापळा रचून लखन उर्फ अवधूत जाधव (वय २२, रा. वांगी) यास पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने जनार्धन उर्फ गजानन काळे (रा. जालना), मेहराज सय्यद (रा. औरंगाबाद), विष्णु आखात (रा. जालना), प्रभु बामणे (रा. जालना), लक्ष्मण गाडे (रा. पाचोड, जि. औरंगाबाद) आणि हरी मखमले (रा. जालना) या पाच जणांच्या मदतीने नांदेड जिल्ह्यातील सहा आणि हिंगोली जिल्ह्यातील एक हायवा टिपर चोरी केल्याचे सांगितले.

त्यानंतर पथकाने टोळीतील चोरट्यांचा शोध सुरू केला. जनार्धन काळे आणि मेहराज सय्यद मिळून आले. त्यानंतर लखन जाधवकडून एक, मेहराजकडून दोन

आणि काळे याच्याकडून तोडलेल्या स्थितीतील दोन हायवा टिपरचे सुटे भाग असे एकूण पाच हायवा टिपर तसेच चोरी करताना वापरलेली जीप असा एकूण एक कोटी दोन लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

पथकात यांचा होता सहभाग

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलिस अधीक्षक कोकाटे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, खंडेराव धरणे यांनी अभिनंदन केले आहे. या पथकात पोलिस निरीक्षक चिखलीकर यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने, फौजदार सचिन सोनवणे, संजय केंद्रे यांच्यासह कर्मचारी गंगाधर कदम, देवा चव्हाण, तानाजी येळगे, मोतीराम पवार, रणधीर राजबन्सी, बजरंग बोडके, महेश बडगु, अर्जुन शिंदे आणि कलीम शेख यांचा सहभाग होता.

या प्रकरणी आत्तापर्यंत सात गुन्हे उघडकीस आले असून टोळीतील इतरांचा शोध घेणे सुरू आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील तपासकामी आरोपींना ग्रामिण ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

- द्वारकादास चिखलीकर,पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा