नांदेडला मंत्रिपदाची आशा धूसरच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Zilla Parishad

नांदेडला मंत्रिपदाची आशा धूसरच...

नांदेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा अखेर मंगळवारी (ता. नऊ) शपथविधी झाला. नांदेड जिल्ह्यात भाजपचे चार आणि शिवसेनेचा एक आमदार असूनही नांदेड जिल्हा मंत्रिपदापासून वंचित राहिला असून नांदेडच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. कालच सोमवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी नांदेडच्या मेळाव्यात माझ्यासोबत आलेले सगळेच मुख्यमंत्री असल्याचे सांगितले होते त्यामुळे नांदेडला मंत्रीपद मिळण्याची शक्यता कमीच होती. आता भविष्यात मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतरच नांदेडला संधी मिळणार का? याची चर्चा होत राहील.

मराठवाड्यात औरंगाबादनंतर नांदेड हा महत्वाचा जिल्हा. या जिल्ह्याने डॉ. शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण या पिता पुत्राला दोन दोन म्हणजेच चार वेळेस मुख्यमंत्रीपद दिले. त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेकांना राज्यात त्याचबरोबर केंद्रातही मंत्रीपदाची संधी मिळाली होती. मागील महाविकास आघाडीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रीपद मिळाले होते तसेच ते नांदेडचे पालकमंत्रीही होते. आता शिंदे - फडणवीस यांच्या सरकारमध्ये संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली.

नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभेचे आणि दोन विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यात भीमराव केराम (किनवट), डॉ. तुषार राठोड (मुखेड) आणि राजेश पवार (नायगाव) हे तीन आमदार भाजपचे आहेत तर राम पाटील रातोळीकर हे आमदार विधानपरिषदेवर आहेत. तसेच शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर आहेत. त्यामुळे या पाच जणांपैकी एकाची तरी वर्णी लागावी, अशी अपेक्षा होती. श्री. केराम आणि श्री. राठोड यांची दुसरी टर्म होती तसेच राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना संधी मिळेल, अशीही चर्चा होती. मात्र, मंत्रीमंडळात नांदेडला स्थान मिळाले नाही. यावेळी अनेकांनी माजी आमदार सुभाष साबणे यांची आठवण काढत साबणे जर आमदार असते तर त्यांचा नक्कीच विचार झाला असता, अशी चर्चाही ऐकावयास मिळाली.

मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर शिंदे - फडणवीस यांच्या सरकारमध्ये नांदेड जिल्हा मंत्रीपदापासून वंचित राहिला असून आता पालकमंत्रीपद भाजपला मिळणार की शिंदे गटाला मिळणार? याची चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्री आता जिल्ह्याबाहेरील मिळणार हे नक्की आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि खासदार सुधाकर श्रृंगारे हे भाजपचे आहेत तर दुसरीकडे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आपआपल्या पक्षाचा पालकमंत्री व्हावा, असा प्रयत्न राहणार आहे. तसेच पालकमंत्री मराठवाड्याचा मिळणार की बाहेरचा याचीही चर्चा सुरू झाली आहे.

अशोक चव्हाण यांच्या भूमिकेकडे लक्ष...

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे कॉँग्रेसचे असले तरी त्यांचे सगळ्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. त्यांच्यासोबत कॉँग्रेसमध्ये काम केलेले आणि काही काळ शिवसेनेत आणि नंतर भाजपात गेलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि मराठवाड्यातील अब्दुल सत्तार हे देखील कॉँग्रेसमधून शिवसेनेत आणि नंतर शिंदे गटात गेले असून या दोघांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सत्तार आणि विखे पाटील याचा देखील नांदेडचे पालकमंत्री म्हणून विचार होऊ शकतो.

Web Title: Nanded Hope Ministership Guardian Minister

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..