नांदेड : डिजिटल शिक्षण विद्यार्थ्यांना कसे मिळणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

teacher

नांदेड : डिजिटल शिक्षण विद्यार्थ्यांना कसे मिळणार?

नांदेड ः जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना माहिती व तंत्रज्ञान यांच्याशी जोडले जावे व त्याच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाचे धडे देता यावेत, यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये डिजीटल वर्ग सुरु करण्यात आले आहेत. याचा विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी लाभ देखील होत होता. पण हे डिजीटल वर्ग चालविण्यासाठी आवश्यक आहे तो वीजपुरवठा. पण विजेचे बिल भरण्यासाठी शाळांजवळ निधी उपलब्ध नसल्याने जिल्हा परिषदेच्या अनेक शाळेची वीज कापण्यात आली आहे. परिणामी डिजिटल वर्ग बंद पडले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षण मिळणार कसे?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळेत संगणक, टीव्ही संच, प्रोजेक्टर, रेडीओ यासारखी विविध शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या डिजीटल साहित्यांचा उपयोग करून अध्ययन व अध्यापन करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे हे अपेक्षित आहे. पण या सर्व साहित्यांसाठी विजेची गरज आहे. यामुळे सर्व शाळांना वीजजोडणीसुद्धा देण्यात आली. पण वीज बिल भरण्यासाठी शाळेला कोणताच निधी देण्यात येत नसल्याने अनेक शाळांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

व्यावसायिक दराने बिल आकारणी

सुरुवातील शाळांना घरगुतीप्रमाणे वीज बिलाची आकारणी करण्यात येत होती. यामुळे बिल कमी येत असल्यामुळे निधी नसतानादेखील शिक्षक बिल भरून वीजपुरवठा सुरु ठेवायचे. परंतु, मागील आठ ते नऊ वर्षापासून शाळेचे वीजबिल हे व्यावसायिक दराने आकारण्यात येत असल्याने वीजबिल मोठ्या प्रमाणात येते व हे भरण्यासाठी शाळेजवळ निधीही नाही.

ग्रामपंचायतीही हतबल

ग्रामपंचायतीचा १४ व्या वित्त आयोगाचा आराखडा तयार करताना त्यात शिक्षण व आरोग्य यासाठी देखील निधीची तरतूद करण्यात आली आहे. तरी पण ग्रामपंचायती याकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्यामुळे शिक्षण व आरोग्य हे अडगळीत पडले आहे. तरतूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायतीने शाळेचे वीज बिलांचा भरणा केला तर गावातील विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षणाचा लाभ होऊ शकतो. पण हे वीज बिल भरण्यास ग्रामपंचायतीची नकारघंटा असल्याने ग्रामीण भागातील त्यांच्या गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

हेही वाचा: "मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

शाळांची सद्यःस्थिती

  • विजेचे बिल भरण्याचे शाळेपुढे आव्हान

  • शासनाने निधी कमी केल्याने शाळेचे व्यवस्थापन चालविणे झाले कठीण

  • डिजीटल शिक्षणाचे साहित्य धूळखात

  • शाळेचे वीज भरण्यास ग्रामपंचायतीचीही नकारघंटा


नांदेड जिल्ह्यामध्ये दोन हजार १९७ शाळा आहेत. त्यापैकी दोन हजार ५९ शाळांमध्ये वीज आहे. १३८ शाळांमध्ये वीज कनेक्शन नाही. सदर शाळांची वीज जोडणीसाठी पाठपुरावा सुरु आहे.

- सविता बिरगे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद.

loading image
go to top