
Nanded : रानडुकराच्या हल्ल्यात पती-पत्नी जखमी
हिमायतनगर : तालुक्यातील टेंभी शिवारात शेतात काम करीत असतांना झुडपात दबा धरून बसलेल्या रानडुकराने पती, पत्नीवर जोरदार हल्ला चढवला. या घटनेत शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्यांचे पत्नीला किरकोळ जखम झाली आहे.
जखमी शेतकऱ्यांवर हिमायतनगर येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले आहे. हि घटना मंगळवारी (ता.३१) रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान घडली आहे. टेंभी शिवारात गट नंबर २०६ मध्ये काम करत असतांना अचानक रानडुकराच्या कळपाने शेतमजुर शंकर दादाराव सुरोशे (वय ३१) आणि त्यांची पत्नी निकिता सुरोशे (वय २२) यांच्यावर हल्ला चढविला.
या घटनेत शंकर सुरोशे यांच्या पोटाला रानडुकराने जब्बर चावा घेतला. आरडा ओरड झाल्याने रानडूकराचा कळप पळून गेला. वन विभागाला घटनेची माहीती देण्यात आली. परंतू वन विभागाचे अधिकारी, किंवा कर्मचाऱ्यांकडून जखमीची विचारणा झाली नसल्याचे सांगण्यात आले. तालुक्यात रानडुक्कराची संख्या मोठी असून वनविभागाने रानडुक्कराचा बंदोबस्त करून जखमी शेतकऱ्याला वन विभागाकडून आर्थीक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.