नांदेड : पत्नीचा खून करून पतीकडून आत्महत्येचा प्रयत्न

प्रल्हाद कांबळे
Thursday, 24 September 2020

येथील सार्वजनीक बांधकाम विभागात वसंत पोटजाळे (वय ५७) चौकीदार पदावर कार्यरत आहे. तो आपली पत्नी ज्योती (वय ३०) हिच्या चारित्र्यावर संशय घेत असे.

नांदेड : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा गळा चिरुन पतीने निर्घृण खून केला. त्यानंतर स्वत: उंदीर मारण्याचे विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शहराच्या स्वामी विवेकानंद नगरमध्ये गुरुवारी (ता. २४) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
येथील सार्वजनीक बांधकाम विभागात वसंत पोटजाळे (वय ५७) चौकीदार पदावर कार्यरत आहे. तो आपली पत्नी ज्योती (वय ३०) हिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यातून त्यांचे नेहमी वाद होत असत. यातूनच त्याने पत्नी ज्योतीसोबत बुधवारी (ता. २३) रात्री भोजन करुन झोपले. त्याने शांत डोक्याने गुरुवारी पहाटेच्या सुमारास पत्नीचा गळा चिरुन खून केला. यानंतर त्याने उंदिर मारण्याचे विष प्राशन केले. मात्र तो यातून बचावला. ही बाब सकाळी उघडकीस आली. परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. 

हेही वाचा -  नांदेड : दुथडी वाहणाऱ्या गोदावरीत युवकाचा मृत्यू -

वसंत पोटजाळेविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल 

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिमन्यु सोळंके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी भेट दिली. पोलिसांनी आरोपी वसंत पोटजाळे याला ताब्यात घेतले. त्याने पत्नी ज्योतीचा खून केल्याची कबुली दिली. यानंतर भाग्यनगर पोलिसांनी वसंत पोटजाळेविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. 

चाईल्ड लाईनच्या कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप 

नांदेड : परिवार प्रतिष्ठान सेवाभावी संस्था नांदेड संचलित चाईल्ड लाईनच्या वतीने गुरुवारी (ता.२४) सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, डॉ. सुप्रीया पाटोदेकर यांची उपस्थिती होती. चाईल्ड लाईनच्या कर्मचाऱ्यांना अनेकवेळा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. म्हणून उशिरा का होईना चाईल्ड लाईनच्या सर्व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्क, फेसशील्ड व पीपीई किटचे वाटप करण्यात आले. यावेळी चाईल्ड लाईनचे समन्वयक बालाजी आलेवार, आशा सुर्यवंशी, संगीता कांबळे, नीता राजभोज, इंद्रजीत मोरे, जयश्री दूधाटे, अश्‍विनी गायकवाड, अर्चना पारळकर व एकनाथ पाच्छे यांची उपस्थिती होती.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Husband attempted suicide by killing his wife nanded news