नांदेड : दुथडी वाहणाऱ्या गोदावरीत युवकाचा मृत्यू

प्रल्हाद कांबळे
Thursday, 24 September 2020

सिद्धार्थनगर परिसरातील करबला कब्रस्तानच्या भिंतीवरून मोहम्मद आयान मोहम्मद कलीम (वय १५, रा. करबला रोड) याने गोदावरीच्या पात्रात पोहण्यासाठी उडी मारली.

नांदेड : विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गोदावरीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे पाण्यात पोहण्याचा मोह अनेकांना पडत असून, पोहण्यासाठी पात्रात उडी घेतलेल्या एका पंधरावर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २३) घडली. बुडालेल्या युवकाचा मृतदेह गुरुवारी (ता. २४) सकाळी सापडला.

याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी (ता.२३) सायंकाळच्या वेळी सिद्धार्थनगर परिसरातील करबला कब्रस्तानच्या भिंतीवरून मोहम्मद आयान मोहम्मद कलीम (वय १५, रा. करबला रोड) याने गोदावरीच्या पात्रात पोहण्यासाठी उडी मारली. मात्र, बराच वेळ होवूनही तो बाहेर आला नाही. त्यानंतर ही माहिती त्याच्या घरी समजल्यानंतर नातेवाईकांनी त्याचा गोदावरी नदीत शोध घेतला. मात्रतो सापडला नाही. शेवटी नातेवाईकांनी इतवारा पोलिस आणि अग्निशामक दल व जिवरक्षांना ही माहिती दिली. यानंतर मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशीर झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते.

हेही वाचाहिंगोली : तुरीच्या डाळीने शंभरी गाठली

इतवारा पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद 

गुरुवारी (ता. २४) सकाळी सहावाजेपासूनच अग्निशमक दलाने बोटीच्या साह्याने शोध मोहिमेला सुरुवात झाली. तरीही मुलगा सापडत नसल्याचे बघून अब्दुल लतीफ अब्दुल मजीद व मोहम्मद नासेर यांनी तरबेज पोहणाऱ्या पाच ते सहा जणांना बोलावले. त्यांनी गोदावरी पात्रात बुडालेल्या मुलाला मृतावस्थेत बाहेर काढले. ज्या ठिकाणी त्याने उडी घेतली होती त्याठिकाणापासून खूप अंतरावर मोहमद आयान हा गाळात नदी किनारी फसला होता. महापालिकेचे अग्नीशमक दलाचे प्रमुख तथा फायर अधिकारी रईस पाशा यांनी इतवारा पोलिस व गोदावरी जीवरक्षकांची मदत घेत हे शोध कार्य सुरु ठेवले होते. अखेर त्यांच्या परिश्रमानंतर आयान याचा मृतदेह सापडला. इतवारा पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: A youth died in Godavari nanded news