नांदेडमध्ये खळबळ : पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या; नरंगल येथील घटना

नायगाव पासून १५ कि. मी. अंतरावर असलेल्या नरंगल येथे शुक्रवारी सकाळी पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने चांगलीच खळबळ उडाली होती.
नायगाव तालुक्यातील घटना
नायगाव तालुक्यातील घटना

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : कौटुंबिक वादातून दारुड्या पतीने पत्नीचा धारधार शस्त्राने खून करुन स्वतः शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नायगाव तालुक्यातील नरंगल येथे शुक्रवारी (ता. ११) रोजी सकाळी घडली. सदर प्रकरणी मुलाच्या फिर्यादीवरुन मयत वडीलांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नायगाव पासून १५ कि. मी. अंतरावर असलेल्या नरंगल येथे शुक्रवारी सकाळी पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. सदरच्या घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक रामराव पडवळ व उपनिरीक्षक श्री. बाचावार हे फौजफाट्यासह नरंगल येथे पोहचले. याबाबत अधिक माहिती घेतली असता नरंगल येथील मुकींद भुजंग पट्टेकर हा दारुच्या नशेत नेहमीच पत्नीला मारहाण करुन भांडण करत होता. गुरुवारी रात्रीही शेतीच्या वादातून पत्नी रेणूकाबाईसोबत वाद झाला. पण हा वाद नेहमीचाच असल्याने रेणूकाबाई ही शुक्रवारी सकाळी शेतात असलेल्या जनावराचे दुध काढण्यासाठी सकाळी पाच वाजताच्या दरम्यान शेताकडे गेली होती.

हेही वाचा -

पत्नी शेतात गेली असल्याची संधी साधून तो ही पत्नीच्या मागेच शेतात गेला आणि धारधार शस्त्राने पत्नीचा शेतातच खून केला. पत्नी जाग्यावरच मृत्यू पावल्यानंतर स्वतः ही दुसऱ्याच्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गावात समजताच अनेकजणांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तर काहींनी या घटनेबाबत नायगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक रामराव पडवळ यांनी घटनास्थळाचा रितसर पंचनामा करुन दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले.

शव विच्छेदन झाल्यावर दोन्ही प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून सदर प्रकरणी मुलगा शिवाजी मुकींद पट्टेकर याच्या तक्रारीवरुन मयत मुकींद भुजंग पट्टेकर याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मयत आरोपी मुकींद हा सतत दारु पिऊन असायचा व दारुच्या नशेत पत्नीला नेहमीच शिविगाळ करुन मारहाण करत तर होताच पण त्याच्या दारुड्या स्वभावामुळे गावातील नागरिकही चार हात दुर राहत होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com