नांदेड : आसान नगर परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष; नागरिकांत प्रचंड रोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded kandhar Water scarcity

नांदेड : आसान नगर परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष; नागरिकांत प्रचंड रोष

कंधार : नवीन वस्त्यात पाणी पुरवठा करण्यासाठी कंधारमधील हुतात्मा स्मारकात दोन लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यात आले खरे, पण हे जलकुंभ गेल्या पाच ते सात वर्षांपासून शोभेची वस्तु बनले आहे. यामुळे जलकुंभाचे उद्देश साध्य झाले नसल्याचे चित्र आहे. कंत्राटदारांकडून अद्याप हे जलकुंभ पालिकेला वर्ग केले गेले नसल्याची माहिती आहे. कंत्राटदार व पालिका प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाचा फटका मात्र आसान नगर परिसरातील नागरिकांना बसत असून येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

शहराला कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्यासाठी लिंबोटी धरणातून २५ ते ३० कोटींची पाणी पुरवठा योजना घेण्यात आली. अद्यापही ही योजना पूर्णपणे कार्यान्वित झाली नाही, हे विशेष होय. पाणी पुरवठा योजना करताना भीमगडावरील नवीन वस्त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी हुतात्मा स्मारकात दोन लाख लिटरचे जलकुंभ उभारण्यात आले. नवीन वस्त्यांचा विचार केला तर कमीतकमी पाच लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ आवश्यक होते, परंतु दोन लाख लिटरवरच बोळवण करण्यात आली. कमी क्षमतेचे का असे ना हे जलकुंभ सुरू करणे आवश्यक होते. परंतु गेल्या पाच-सात वर्षांपासून त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही.

मधल्या काळात आसान नगर मध्ये पाईप लाईन करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. जलकुंभ झाले, पाइपलाइन झाली, आता पाणी मिळणार असे तेथील नागरिकांना वाटत होते. परंतु पाइपलाइन करून अडीच-तीन वर्षे लोटूनही पाणी काही मिळाले नाही. लिंबोटी धरणातून करण्यात आलेल्या कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजनेचे बिल रखडल्याने कंत्राटदाराने या योजनेला पूर्णपणे पालिकेकडे वर्ग केलेले नाही. त्यामुळे अद्यापही शहरात म्हणावा तसा पाणी पुरवठा होत नाही.

दोन दिवस आड पाणी सोडले जाते. याच योजनेत हुतात्मा स्मारकात जलकुंभ बांधण्यात आल्याने कंत्राटदार जलकुंभला पाण्याची पाइपलाइन जोडण्यासाठी चालढकल करीत असल्याची चर्चा आहे. बिल रखडण्यास काय कारण झाले, यात कंत्राटदाराची चूक आहे की पालिका प्रशासनाची हा संशोधनाचा विषय असून गेल्या आठ-दहा वर्षात झालेल्या नगरपालिकेतील गटबाजीचे राजकारण याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

मतदानावर बहिष्कार

आसान नगर परिसरातील नागरिकांनी पाणी मिळावे म्हणून सर्वच पुढाऱ्यांकडे ग्राहणे मांडले. निवडणुकीच्या वेळी त्यांना आश्वासन मिळतात. पण त्याची पूर्तता होत नाही. यामुळे त्यांच्यात प्रचंड नाराजी पसरली आहे. नळ जोडणीसाठी आता येथील नागरिक आक्रमक झाले असून पाण्यासाठी येणाऱ्या पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार त्यांच्याकडून केला जात असल्याची चर्चा आहे.

Web Title: Nanded Kandhar Water Scarcity Hutatma Memorial Water Tank Water Management

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..