
नांदेड : जिल्ह्यात रस्त्यांवरील अपघातात मोठी वाढ
नांदेड : सद्यस्थितीत सूर्य आग ओकत आहे. त्यासोबतच जिल्ह्यामध्ये अपघाताचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांच्या अपघाताची संख्या मोठी आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक झाले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील रस्ते रुंद होत आहेत. काही ठिकाणी झाले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेगही कमालीचा वाढल्याचे चित्र दिसत आहे. या वाढत्या वेगाच्या धुंदीने अनेकांचे बळी जात आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर अपघात रोखण्याची मुख्य जबाबदारी वाहनचालकांवर आहे. सुरक्षित अंतर, सुरक्षित वेग आणि सुरक्षित प्रवास ही त्रिसूत्री अंमलात आणली पाहिजे. वाहनांच्या ब्रेकपेक्षा मनाचा ब्रेक हा अपघात टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, हेही लक्षात ठेवले पाहिजे. तरच हे अपघात रोखता येणे शक्य आहे.
जिल्ह्यामध्ये वाढते अपघात ही एक गंभीर समस्या बनू पाहत आहे. सध्या रस्त्यांचा विकास तर होत आहे. व्यवसाय, कृषी, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत वेगाने प्रगती करत असलेल्या जिल्ह्यात वाहतून अत्यंत वेगाने वाढत आहे. प्रवासी व माल वाहतूक गेल्या काही वर्षात कितीतरी पटीने वाढली आहे. या वाढत्या वाहतुकीमुळे भीषण अपघात होऊन शेकडो माणसांचा घात होत आहे. ते पाहिले म्हणजे वाहतुकीच्या बाबतीत आपले काहीतरी चुकते आहे व या चुकांना व बेजबाबदारपणाला आळा घातला नाही तर प्राणहानी आपण रोखू शकणार नाही, अशी परिस्थिती आहे.
दररोज अपघातामध्ये अनेक युवक हे मृत्युमुखी पडत आहेत. ज्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. अशा दुर्दैवी घटना वाढत असून याला कुठेतरी ब्रेक मिळावा, या अनुषंगाने वाहतूक नियमांचे पालन करून हेल्मेट वापरून वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल. तसेच दारू पिऊन कोणीही वाहन चालवू नये. दुचाकीचालकांनी हेल्मेटचा वापर करावा. प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
- अनिकेत चव्हाण, निवृत्त अधिकारी.