
भोकर तालुक्यातील सोमठाणा, देवठाणा व सिंगारवाडी परिसरात दोन - तीन महिन्यापासून बिबट्याचा वावर वाढला आहे. अनेकवेळा मेंढपाळांच्या निदर्शनास बिबट्या आल्यामुळे लोकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
नांदेड : भोकर तालुक्यातील देवठाणा येथे शुक्रवारी (ता. चार) रात्रीच्या वेळी बिबट्याने जनावराच्या गोठ्यावर केलेल्या हल्ल्यात वगार ठार झाले. यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भोकर तालुक्यातील सोमठाणा, देवठाणा व सिंगारवाडी परिसरात दोन - तीन महिन्यापासून बिबट्याचा वावर वाढला आहे. अनेकवेळा मेंढपाळांच्या निदर्शनास बिबट्या आल्यामुळे लोकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भागात जंगल नसल्यामुळे बिबट्याने शेतातील आखाड्यावर हल्ला करून जनावरे जखमी करीत असल्याच्या अनेक घटना परिसरात घडत आहेत. आठवड्यापूर्वी सिंगरवाडी येथील सहा महिन्याच्या वगारावर हल्ला करून फडशा पडला होता. या घटनेची वनविभागाने दखल घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा - हिंगोली : खडकाळ माळरानावर वनविभागाने निर्माण केले नंदनवन
दरम्यान देवठाणा येथे शुक्रवारी (ता. चार) रात्री तुकाराम काशिनाथ कस्तुरे यांच्या शेतातील आखाड्यावर दीड वर्षाच्या वगारावर हल्ला करून ठार केले. ही घटना शेतकऱ्याने स्वखर्चाने आखाड्यावर बसलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा वन कर्मचाऱ्यांना सुगावा लागताच वनपरिक्षेत्र अधिकारी बी. पी. आडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आनंद खटाने, वनरक्षक सहदेव दोसलवाड, वनरक्षक गोविंद जाधव यांनी पंचनामा केला. यावेळी देवठाणा येथील वैजनाथ कतुरे, अमृत शिंदे हजर होते. सध्या सर्वत्र रब्बी हंगामाचा जोर चालू असून गहू हरभरा आदी पिकांना पाणी देण्याचे काम चालू आहे रात्री-अपरात्री शेतकऱ्यांना शेतामध्ये जावे लागत असल्यामुळे सदर घटनेमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाल्याचे दिसून येते.