Video - नांदेडमध्येही नवजात बालकांचा जिव धोक्यातच

शिवचरण वावळे
Sunday, 10 January 2021

शनिवारी (ता. नऊ) मध्यरात्री पर्यंत आॅडिट सुरु होते. असे असले, तरी महापालिकेच्या मालकीच्या इमारतीमध्ये सुरु असलेली एसएनसीयु विभागाची इमारत केव्हाच बाद झाली आहे. परंतु अद्यापही या इमारतीमध्ये नवजात बालकांवर उपचार सुरु आहेत. त्या कक्षात अनेक ठिकाणी छताचा गिलावा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

नांदेड - श्‍यामनगर येथील स्त्री रुग्णालयात १४ बेडचे न्यू नेटल केअर युनिट (एसएनसीयू) अतिदक्षता विभाग आहे. ज्या इमारतीमध्ये हा विभाग सुरु आहे, त्या इमारतीस बांधकाम विभागाने धोकादायक व मुदतबाह्य इमारत म्हणून घोषित केले आहे. हा विभाग नव्या इमारतीत स्थलांतरीत करण्यासाठी तीन महिण्यापासून ४४ लाखाचे बजेट येऊन पडले असताना प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे इथेही बालकांचा जिव धोक्यातच असे म्हणण्याची वेळ आली आहे.

भंडारा येथील एसएनसीयु अतिदक्षता विभागास मध्यरात्री आग लागुन दहा बालकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यानंतर राज्यभरातील सर्व रुग्णालयाचे फायर सेफ्टी आॅडीट करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नांदेडच्या शासकीय स्त्री रुग्णालयाचे देखील शनिवारी (ता. नऊ) मध्यरात्री पर्यंत आॅडिट सुरु होते. असे असले, तरी महापालिकेच्या मालकीच्या इमारतीमध्ये सुरु असलेली एसएनसीयु विभागाची इमारत केव्हाच बाद झाली आहे. परंतु अद्यापही या इमारतीमध्ये नवजात बालकांवर उपचार सुरु आहेत. त्या कक्षात अनेक ठिकाणी छताचा गिलावा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

हेही वाचा- ग्रामपंचायत निवडणूक हदगांव तहसीलचा अजब कारभार; कामचुकार कर्मचाऱ्यांचा बल्लेबल्ले

तीन महिण्यापूर्वीच ४४ लाखाचा निधी आला 

विशेष म्हणजे यापूर्वी प्रसूती विभागातील महिलांच्या कक्षातील छताचा गिलावा कोसळुन एका महिलेस गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर या ठिकाणचा प्रसूती विभाग हा बाजुच्या नव्या तिन मजली इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात आला. मात्र याच कालबाह्य इमारतीमध्ये आजही नवजात बालाकांवर उपचार सुरु असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे हा विभाग नव्या इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यासाठी तीन महिण्यापूर्वीच ४४ लाखाचा निधी आला असताना देखील टेंडर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने हा विभाग याच मोडकळीस व धोकादायक इमारतीमध्ये सुरु असल्याचे समजते.

हेही वाचा- पोलिसांचे सर्च आॅपरेशन मिशन : गंभीर गुन्ह्यातील नांदेडच्या फरार सव्वाशे गुन्हेगारांना लवकरच करणार अटक- प्रमोद शेवाळे

१८ पैकी अद्याप एकाही व्यक्तीला टेंडर नाही

भंडाऱ्याच्या दुर्घटनेनंतर शासन एसएनसीयु विभागाचे फायर आॅडिट कडे गंभीर पणे लक्ष देत असले तरी, मोडकळीस आलेली व मुतदबाह्य इमारतीतून श्‍यामनगर स्त्री रुग्णालयातील एसएनसीयु विभाग नव्या इमारतीमध्ये नेमका कधी स्थलांतरीत होणार याकडे कुणाचेही लक्ष नाही. एसएनसीयु विभाग नव्या इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यासाठी १८ पैकी अद्याप एकाही व्यक्तीला टेंडर मिळाले नाही. याचे गौडबंगाल काय? याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण लक्ष घालणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दहा वेळा पत्रव्यवहार केला 

बांधकाम विभागाने इमारत धोकादायक असल्याचे यापूर्वीच जाहिर केले आहे. एसएनसीयु विभाग नव्या इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर दहा वेळा पत्रव्यवहार केला आहे. आद्याप नव्या इमारतीमध्ये स्थलांतरीत होऊ शकला नाही. असे असले तरी नियमित देखभाल दुरुस्ती असल्याने धोका होण्याची शक्यता कमीच आहे. बाद झालेले साहित्य सिलबंद करण्यात आले आहे. 
- डॉ. भारत संगेवार , वैद्यकीय अधिक्षक स्त्री रुग्णांलय, नांदेड

नांदेड जिल्ह्यातील इतरही बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded : The lives of newborns are in danger here too Nanded Hospital News