Nanded : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक; सर्वच पक्षांसह इच्छुकांची तयारी पुन्हा सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gram panchayat

Nanded : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक; सर्वच पक्षांसह इच्छुकांची तयारी पुन्हा सुरू

नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेच्या सदस्यांचा कालावधी ता. ३१ आॅक्टोंबर रोजी संपल्यानंतर प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील जिल्हा परिषद, १६ पंचायत समित्यासह नगरपालिका आणि नगरपंचायतीवर सध्या प्रशासक राज सुरू असून आता सगळ्यांचा नजरा निवडणुक कधी जाहीर होणार याकडे लागल्या आहेत. त्या दृष्टीने प्रमुख पक्षांसह इतर पक्षांच्या पदाधिकारी आणि इच्छुकांनी देखील पुन्हा तयारी सुरू केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद, सोळा पंचायत समित्या त्याचबरोबर कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड व हदगाव या दहा नगरपालिका आणि हिमायतनगर नगरपंचायत यांच्या सदस्यांची मुदत संपल्यामुळे या ठिकाणी प्रशासक आहेत. या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आगामी काळात घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आता नांदेड वाघाळा महापालिकेतही प्रशासक म्हणून आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे महापालिकेचीही निवडणुक होणार आहे.

यापूर्वी मे २०२० ते मार्च २०२२ मध्ये मुदत संपलेल्या नांदेड जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि एक नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचेही नियोजन करण्यात आले होते. मात्र, ओबीसी आरक्षण तसेच राज्यातील सत्ताबदल आदी घटनामुळे निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या. आता पुन्हा या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन सगळ्यांच्या नजरा आता पुन्हा निवडणुक आयोग कधी निवडणुका जाहीर करतात, याकडे लागल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजप, शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट), वंचित बहुजन आघाडी, मनसे, एमआयएम, रिपाईचे विविध गट, जनता दल, रासप, स्वाभिमानी, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, प्रहार संघटना, बसपा, समाजवादी पक्ष, मुस्लिम लिग आदी पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली असून चाचपणी सुरू केली आहे. त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांनी देखील पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्या असून आपल्यालाच पक्षाची उमेदवारी मिळावी, यासाठी समर्थकांमार्फत ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरूवात केली आहे. त्या दृष्टीने आपआपल्या भागात होणाऱ्या विविध कार्यक्रमांना देखील इच्छुक आवर्जून हजेरी लावत असल्याचे चित्र सध्या जिल्हाभरात दिसून येत आहे. त्यामुळे कार्यकर्ते देखील सुगीचे दिवस येणार असल्यामुळे कामाला लागल्याचे चित्र आहे.