
नांदेड : रब्बी हंगामातील हरभरा पिकाचा विमा मंजूर
माहूर : रब्बी हंगाम २०२१-२२ मधील हरभरा नुकसानी संदर्भात विमा संरक्षित रक्कम मिळण्यासाठी किसान ब्रिगेड या शेतकरी संघटने कडून केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या शब्दांनुसार माहूर तालुक्यातील पिक विमा संरक्षित रक्कम भरलेल्या शेतकऱ्यांची मागील सहा महिन्याची मागणी पूर्ण झाली असून अडगळीत पडलेल्या माहूर तालुक्यातील पीक विम्याचा प्रश्न निकाली निघाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील वर्षीच्या रब्बी हंगामातील हरभरा पिकाला फिरत्या वादळाबरोबर मर रोगाचा फटका बसला होता. त्यातच शेतात हरभऱ्याची झाडे उभी तर होती मात्र फळधारणा झाली नव्हती, या मुळे माहूर तालुक्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होऊन आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. तालुक्यातील चार महसूल मंडळातील अंदाजे पाचशे शेतकऱ्यांनी एकूण तीन हजार हेक्टर वर क्षेत्रातील हरभरा पिकाचा पिक विमा उतरविला होता. २०२१-२२ रब्बी हंगामातील हरभरा पिकाची परिस्थिती माहूर तालुक्यासह जिल्हाभर काही तशीच होती. परंतु नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुका वगळता इतर तालुक्यांना पिक विमा मंजूर करण्यात आला होता.
प्रत्यक्ष नुकसानीचा आकडा जास्त असल्याने पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांपैकी जवळपास ७० शेतकऱ्यांनी विमा क्लेम सुद्धा दाखल केले होते. परंतु तरी देखील ईफको टोकियो कंपनीने माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा देण्यासाठी कमालीची उदासीनता दाखवली होती. क्लेम सादर केलेल्या शेतकऱ्यांसह पिक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा म्हणून किसान ब्रिगेडच्या वतीने वारंवार आंदोलने तक्रारीचा पाठपुरावा करण्यात आला तरी देखील कोणतीही फलनिष्पत्ती होत नव्हती.
ईफको टोकियो विमा कंपनीच्या बेदरकार धोरणाचा पाढा वाचण्यासाठी किसान ब्रिगेड या शेतकरी संघटनेने थेट जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटनकर यांच्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव'' या कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या फेसबुक लाईव्ह या कार्यक्रमात पिक विमाचा प्रश्न उपस्थित केला गेल्याने सात दिवसात माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा प्रश्न निकाली काढणार असे शब्द जिल्हाधिकारी यांना शेतकरी संघटनेचे नेते अविनाश टनमने यांना दिले होते.
माहूर तालुका किसान ब्रिगेडच्या शेतकरी हितार्थ मागणीला मोठं यश आले आहे. गेल्या सहा महिन्यापासून माहूर तालूका किसान ब्रिगेड सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांनी खरिप हंगामातील तुर व रब्बी हंगामातील हरबरा पिकाचा विमा क्लेम केला असताना सुद्धा ईफको टोकियो विमा कंपनी शेतकऱ्यांना विम्याची रक्कम जमा करण्यास टाळाटाळ करित होती. जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांनी सात दिवसात हा प्रश्न निकाली काढणार असे सांगितले होते. आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसै जमा झाल्याचा संदेश प्राप्त झाला आहे.
- अविनाश टनमने, जिल्हा संघटक, संभाजी ब्रिगेड, माहूर.
Web Title: Nanded Mahur Rabi Season Gram Crop Insurance Approved Collector
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..