Nanded : बाजार बंद ठेवण्याचा अधिकार कुणी दिला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Market Committee

Nanded : बाजार बंद ठेवण्याचा अधिकार कुणी दिला?

नांदेड : हळदीच्या वायद्यांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी येथील दि ग्रेन मर्चंड असोसिएशनने पाच दिवस मोंढा बाजार बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. व्यापाऱ्यांनी बाजार बंद न करता आपल्या मागण्या संबधिताकडे मांडाव्यात, अशी सूचना जिल्हा उपनिबंधकांनी देऊनही व्यापाऱ्यांनी बाजार बंद केला आहे. त्यामुळे व्यापारी बाजार समिती प्रशासनालाही न जुमानता मनमानी कारभार करत असल्याचे स्पष्ट झाले. तर बाजार समिती प्रशासनही हतबल होऊन बघ्याची भूमिका घेत आहे, अशी टीका शेतकऱ्यांनी केली.

दि ग्रेन मर्चंड असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी एनसीडीएक्स आणि बीएसईवरील हळदीचे वायदे बंद करण्याची मागणी केली. वायद्यामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होत आहे, असा अजब तर्क व्यापाऱ्यांनी मांडलाय. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांनी गुरुवार (ता. आठ) ते सोमवार (ता. १२) पर्यंत बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. परंतु ऐन हंगामात शेतकर्‍यांचा बाजार पाच दिवस बंद करुन शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा अधिकार व्यापार्‍यांना कुणी दिला? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बाजार बंदमुळे शेतकर्‍यांना बाजारात माल विकण्यासाठी अडचणी येत आहेत. याची जबाबदारी बाजार समितीनेही न घेता स्वत: जिल्हा उपनिबंधक प्रशासक असलेल्या नांदेड बाजार समितीने गुरुवारी जाहीर प्रगटन देवून शेतकर्‍यांनी पाच दिवस बाजारात शेतमाल आणू नका, असे आवाहन करुन एकप्रकारे व्यापार्‍यांचीच बाजू लावून धरल्याची टिका शेतकरी करत आहेत.

व्यापाऱ्यांच्या दबावापुढे बाजार समित्या झुकल्या. व्यापारी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शेतकऱ्यांच्या भल्याच्या बाता मारत शेतकऱ्यांनाच कोंडीत धरत आहेत. व्यापाऱ्यांनी बाजार समित्या बंद न करता, सरकारकडे आपल्या मागण्या करायला हव्या. त्याला कुणाचाही विरोध नसेल. मात्र, बाजार बंद ठेवण्याचा अधिकार व्यापाऱ्यांना नसायला पाहिजे. तो अधिकार शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे बेकायदेशीर बंद पुकारणाऱ्या व्यापाऱ्यांवर बाजार समित्यांनी कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

व्यापारी असोसिएशनसोबत बंदबाबत बैठक झाली. यात वायदे बाजारासंदर्भात शासनाच्या नियंत्रणात काम सुरु आहे. याबाबत सनदशीर मार्गाने मागणी करता येईल. यासाठी बाजार बंद करणे हा उपाय नाही. म्हणून बाजार बंद करु नका असे आवाहन केले होते. बाजार बंद केला तर त्यांना पत्र पाठवून सुचित करु.

- डॉ. मुकेश बाराहते, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड

वायदे बाजार शेतकर्‍यांच्या फायद्याचा आहे. यामुळे हळद उत्पादकांना इतर ठिकाणचे हळदीचे दर कळतात. यातून शेतकरी हुशार होतात. हेच व्यापार्‍यांना नको आहे. यामुळे ते बाजार बंद करुन आम्हा शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत.

- संतोष कदम, हळद उत्पादक, देगाव, ता. अर्धापूर.

Web Title: Nanded Market Close Authority Traders Farmers Committee Administration

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..