नांदेड- २४ तासासाठी मिनी मंत्रालय बंद, २६ जण पॉझिटिव्ह

शिवचरण वावळे
Wednesday, 2 September 2020

 

ग्रामिण भागात जाउन नागरीकांची कोरोना चाचणी करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला मात्र जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, सदस्य अधिकारी व कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यासाठीचा शहाणपणा उशिराने का सुचला यावर उलट सुलट सर्चा सुरु आहे.

नांदेड ः जिल्हा परिषदेच्या वतीने बुधवारी (ता. दोन) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांच्यासह पदाधिकारी, सदस्य तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना ॲन्टीजेन रॅपीड टेस्ट करण्यात आली. एकुण ३६३ अधिकारी व कर्मचारी यांच्यापैकी २६ अधिकारी व कर्मचारी यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

गणपती विसर्जनापूर्वी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्वतःहून कोरोना चाचणी केली. यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सध्यात्यांच्यावर श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या संपर्कातील अधिकारी व कर्मचारी यांच्यापैकी कुणालाही कोरोनाची लक्षणे आढळुन अल्यास त्यांना कोरोना चाचणी करुन घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या थेट संपर्कातील अधिकारी व कर्मचारी सेल्फ क्वॉरंटाईन झाले आहेत.

हेही वाचा-  नांदेड रेकॉर्ड ब्रेक तब्बल ३८० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, सहा रुग्णांचा मृत्य

जिल्हा परिषद कार्यालय २४ तास बंद

जिल्हाधिकारी यांना जे जमले ते जिल्हा परिषधेच्या अधिकाऱ्यांना का जमले नाही. असा सवाल उपस्थित करण्यात येत असून, एकदम २६ अधिकारी व कर्मचारी बाधित झाल्याने जिल्हा परिषद कार्यालय २४ तासा करिता बंद ठेवण्याची नामुस्की पहिल्यांदाच जिल्हा परिषदेवर ओढवली आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने ता. १२ आॅगस्ट रोजी स्थायी समितीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व सदस्य यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोना चाचणी करुन घेण्यासाठीच्या सुचना देण्यात आल्या होत्या. परंतु आतापर्यंत एकाही अधिकाऱ्यांने किंवा कर्मचारी यांनी कोरोना चाचणी करुन घेतली नव्हती. त्यामुळे अचानक जाग आलेल्या जिल्हा परिषदेने बुधवारी कोरोना चाचणी केली.

हेही वाचा- नांदेडला दुसऱ्या दिवशी परिचारीकांचे काळ्या फिती लावून काम सुरु

मिनी मंत्रालय हादरले

त्यात ३६३ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात २६ अधिकारी व कर्मचारी यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मिनी मंत्रालय हादरले आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणावर अधिकारी, कर्मचारी बाधित होण्याची ही पहिलीच वेळ असून, कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होऊन नये म्हणून व जिल्हा परिषदेच्या इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी २४ तास इमारत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी दिली.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Mini Ministry Closed For 24 Hours 26 Positive Nanded News