esakal | नांदेडचे खासदार हे मुदखेडमध्ये फुकटचा चहा पिण्यासाठी येतात- आमदार अमर राजूरकर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मुदखेड शहराच्या विकासासाठी खा. चिखलीकर किंवा भाजपच्या एकाही लोकप्रतिनिधीने आजपर्यंत कुठलाही निधी दिला नाही. मुदखेडचा विकास हा या भागाचे नेते अशोक चव्हाण यांनीच केलेला आहे.

नांदेडचे खासदार हे मुदखेडमध्ये फुकटचा चहा पिण्यासाठी येतात- आमदार अमर राजूरकर

sakal_logo
By
गंगाधर डांगे

मुदखेड ( जिल्हा नांदेड) : नांदेड भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात असलेल्या मुदखेडमध्ये फक्त फुकटचा चहा पिण्यासाठी येत असतात. त्यांच्या हातात विकासासाठी निधी देण्याचे कोणतेही मार्ग शिल्लक राहिले नाहीत. खासदार निधी हा पंतप्रधानांनी काढून घेतला आहे. मुदखेड शहराच्या विकासासाठी खा. चिखलीकर किंवा भाजपच्या एकाही लोकप्रतिनिधीने आजपर्यंत कुठलाही निधी दिला नाही. मुदखेडचा विकास हा या भागाचे नेते अशोक चव्हाण यांनीच केलेला आहे. असे प्रतिपादन आसोमवारी (ता. चार) मुदखेड नगरपालिकेच्या वतीने घरकुल लाभार्थ्यांना धनादेश वाटप कार्यक्रमात पालिका सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात आमदार अमर राजूरकर यांनी बोलताना व्यक्त केले.

हेही वाचादुचाकी चोरांच्या उपद्रवामुळे नांदेडकर झाले त्रस्त, पोलिस प्रशासन मात्र सुस्त -

मुदखेड नगरपालिकेच्या वतीने आज पालिका सभागृहात मुदखेड शहरातील प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटपाचा कार्यक्रम आमदार राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला होता. या कार्यक्रमास जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, नांदेड महानगरपालिकेचे नगरसेवक संदीप सोनकांबळे, नगराध्यक्ष मुजीब अन्सारी जहागीरदार, मुख्याधिकारी रामराजे कापरे, शेख करीम शेख सादत, संजय आऊलवार, चांदु चमकुरे, किशोर पारवेकर, चांदु बोकेफोडे, श्याम चंद्रे, बबलू किराणावाले, उत्तम चव्हाण, सलाम सर, इम्रान शेठ मच्छीवाले, रावसाहेब चौदंते, रणजीत पाटील डोलारकर यांच्यासह आजी- माजी नगरसेवक, काँग्रेस कार्यकर्ते, पालिका कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुदखेड पालिकेचे गटनेते माधव कदम यांनी केले. यावेळी मुदखेड पालिकेचा कारभार हा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चांगला चालत असून मुदखेड शहराच्या विकासात मोठी भर पडलेली आहे. सोमवारी (ता. चार) ११३ मंजुर घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना ३८ लाख ४0 हजार रुपयाचे धनादेश वाटप करण्यत येत असल्याचे यावेळी आपल्या प्रास्ताविकात गट नेते माधव कदम यांनी सांगितले.

मुदखेड पालिका शहराच्या विकासासाठी विविध स्तरावर विकास कामे करीत आहे. शहराच्या अनेक भागात विकास कामे मोठ्या प्रमाणात चालू असून या भागाचे नेते अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून आगामी काळात शहराच्या प्रत्येक भागात स्वच्छ व शुद्ध पाणी मिळण्यासाठी ४३ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजनेचा आराखडा मंजूर झाला असून शहरातील ५२१ नवीन घरकुल मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्तावित आहेत. हे घरकुल लवकरच अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून मंजूर करुन आणण्यात येईल असे यावेळी मुदखेड पालिकेचे नगराध्यक्ष मुजीब अन्सारी जहागीरदार यांनी सांगितले.

येथे क्लिक करापरभणी : कुटुंब नियोजनात पुरुष पिछाडीवर, वर्षभरात दोन पुरुषांची तर २१६ महिलांची नसबंदी

मुदखेड शहराच्या विकासामध्ये आणखी भर पाडण्यासाठी पालिकेच्या नगरसेवकांनी मुदखेड शहराच्या नवीन वस्त्यांमध्ये विकास कामासाठी लक्ष देऊन नागरिकांच्या संपर्कात राहून त्या भागात विकास गंगा नेण्यासाठी प्रयत्नरत रहावे. ज्या भागात विकास कामे झाली नाहीत त्या भागामध्ये अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कामे करावीत असे सांगून सध्या मुदखेड शहरामध्ये भाजपच्या काही लोकांनी शहरातील लोकांना भूलथापा देण्याचे नाटकीय राजकारण चालवले आहे. या नाटक करणाऱ्या भाजपवाल्यांनी मुदखेड शहराच्या विकासासाठी कुठलेही योगदान दिलेले नाही अशी टीकाही जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी केली.

मुदखेड शहराच्या विकासासाठी या भागाचे नेते अशोक चव्हाण हे कटिबद्ध असून नुकतेच त्यांनी मुदखेड शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ४३ कोटी रुपयाचा आराखडा मंजूर करून घेतला आहे. त्याचबरोबर मागील काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या भुयारी मार्गावर येणाऱ्या काही खाजगी जमीन मालकांना मावेजा देण्यासाठी एक कोटी ८५ लाख रुपये मुदखेड पालिकेस अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे लवकरच भुयारी मार्गाचा प्रश्न निकाली लागणार असल्याचे आ. राजूरकर यांनी यावेळी सांगितले. मुदखेड शहरातील बुद्ध विहारासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजुरीसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. अशी माहिती यावेळी उपस्थितांना देऊन सध्याला नांदेडचे भाजपचे खा. प्रताप पाटील चिखलीकर हे उठ सूट मुदखेडमध्ये येत आहेत व शहरात फोटो काढून व्हाट्सअप, सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा उद्योग कार्यकर्त्यांच्या माध्यमातुन करीत आहेत. ते फक्त मुदखेडकरांचा फुकटचा चहा पिण्यासाठी मुदखेडमध्ये येतात अशा फुकट्यांना थारा देऊ नका अशी टीकाही आमदार राजूरकर यांनी यावेळी बोलताना केली.

संपादन- प्रल्हाद कांबळे