
इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन क्षेत्रात नांदेडला महावितरणचा ठेंगा
नांदेड : पर्यावरण पुरक आणि पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीला पर्याय म्हणून इलेक्ट्रीक वाहनांना मोठ्या प्रमाणात स्विकारले जात आहे. चालू दशकाच्या अखेरपर्यंत देशात विकल्या जाणा-या एकूण वाहनापैकी ३० टक्के ही इलेक्ट्रीक वाहने असणार आहेत. या वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहनधारकांना त्यांच्या वाहनांच्या चार्जींगची व्यवस्था सहजतेने उपलब्ध व्हावी, यासाठी पुढाकार घेत महावितणने राज्यात १३ ठिकाणी इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन सुरु केली असून राज्यातील विविध ठिकाणी दोन हजार ३७५ स्टेशन प्रस्तावित असले तरी, नांदेडला मात्र महावितरण विभागाने ठेंगा दाखवला आहे. (Nanded Electric vehicle charging station)
राज्यभरात ता. २० मे २०२२ च्या आकडेवारीनुसार ६६ हजार ४८२ वाहनांची नोंदणी झाली होती. त्यापैकी नांदेड जिल्ह्यात ८८७ इलेक्ट्रीक वाहनांची नोंदणी झाल्याची प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने माहिती देण्यात आली होती. यात अजून भर पडली असेल यात कुठलीही शंका नाही. असे असताना देखील महावितरण विभागाकडून नांदेडला चॉर्जिंग स्टेशन उभारण्यासाठी पुढाकार घेतला गेला नाही.
महावितरण विभागाकडून यापूर्वी ठाण्यात पाच, नवी मुंबईला दोन, पुणे - पाच आणि नागपूर - एक अशी एकूण १३ चार्जिंग स्टेशन सुरु केली आहेत. याशिवाय महावितरणमार्फ प्रस्तावित अतिरिक्त ४९ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सची कामे प्रगतीपथावर आहेत. यात नवी मुंबई - दहा, ठाणे - सहा, नाशिक - दोन, औरंगाबाद - दोन, पुणे - १७, सोलापूर - दोन, नागपूर - सहा, कोल्हापूर - दोन व अमरावती - दोन अशा चार्जिंग स्टेशनचा समावेश आहे.
यासोबतच राज्य शासनाने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार २०२५ पर्यंत राज्यातील इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग पायाभूत सुविधा बृहन्मुंबई शहर - दीड हजार, पुणे शहर - पाचशे, नागपुर शहर - दीडशे, नाशिक शहर - शंभर, औरंगाबाद शहर - ७५, अमरावती -३०, सोलापुर -२० अशी एकुण दोन हजार ३७५ तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुंबई - नागपूर, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग मुंबई - पुणे, मुंबई - नाशिक, नाशिक - पुणे हे पुर्णत: इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंग सुविधांनी सज्ज करण्यात येणार आहेत.
समृद्धी महामार्गाला नांदेड शहर जोडले जात आहे. त्यामुळे चार्जिंग स्टेशनच्या बाबतीत नांदेड शहराचा देखील विचार व्हावा, अशी नागरीकांकडून मागणी होत आहे. तेव्हा नागरीकांच्या मागणीकडे महावितरण किती गांभिर्याने विचार करेल हे येत्या काळात दिसून येणार आहे. त्यामुळे अजून काही दिवस तरी, नांदेडकरांना चार्जिंग स्टेशनची प्रतिक्षा करावी लागेल.
Web Title: Nanded Mseb Electric Vehicle Charging Station
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..