नांदेड - वीजचोर आकडेबहाद्दरांना महावितरणाचा ‘शॉक’ ३९ गावांत धडक मोहीम, एक हजारापेक्षा अधिक जणांवर कारवाई 

शिवचरण वावळे
Friday, 23 October 2020

अनधिकृतपणे वीज वापरल्याने रोहित्रावर जास्त भार येऊन रोहित्र, नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने आकडे टाकून वीज वापरणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे.

नांदेड - जिल्ह्यातील वीजचोरीला आळा घालण्याच्या दृष्टीने महावितरणतर्फे मागील दोन दिवसांपासून आकडे बहाद्दरांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. अनधिकृतपणे वीज चोरून वापरणाऱ्या ३९ गावांमधील एक हजार २७६ वीजचोरांविरोधात आक्रमकपणे मोहीम राबवून कारवाई करत शॉक दिला आहे. 

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गीते यांच्या निर्देशानुसार वीजचोरीला आळा बसावा, अनधिकृतपणे वीज वापरल्याने रोहित्रावर जास्त भार येऊन रोहित्र, नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने आकडे टाकून वीज वापरणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. या विशेष मोहिमेला गती देण्याच्या दृष्टीने नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर आणि नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील वीजचोरांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे. 

हेही वाचा- कोरोना इफेक्ट - नांदेड एसटी विभागास दोन कोटी ९४ लाखाचा तोटा; लांब पल्ल्‍याच्या बस लवकरच सुरू होणार ​

दोन दिवस आक्रमक मोहीम 

वारंवार अधिकृतपणे वीज कनेक्शन घेण्याबाबत विनंती करूनही अनेक लोक विजेच्या तारेवर आकडा टाकून वीज वापरत असल्याचे दिसून आल्यानंतर गेली दोन दिवस आक्रमकपणे जोरदार मोहीम राबवून भोकर विभागामधील पोमनाळा, देवशीतांडा, शिंदी, कोळी, काळेश्वर, पेवा, पांगरी, कंजारा, कोळेगाव, सावना, बळीराम तांडा, रुई, नीचपूर, राजगड तांडा; तसेच सिंदगी या गावांमध्ये ८२० वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. 

आकडेबहाद्दर वीजचोरांवर कारवाई 

देगलूर विभागातील कोकलेगाव, कुंटूर, किनाळा, चाकूर, कावळगाडा व भायेगाव परिसरातील ४२ वीज चोरांवर कारवाई करण्यात आली. नांदेड ग्रामीण विभागातील निवघा, विजापूर, डोणगाव, देगाव, बामणी, लहान, बिजेवाडी, शेकापूर, कवठा, तेलपूर फाटा, अंबेसावंगी, पेनूर, मारतळा, कापशी खुर्द, जोशीसावंगी आदी गावांमध्ये २९७ आकडे वापरणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर नांदेड शहर विभागांतर्गत ११७ आकडेबहाद्दर वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. 

हेही वाचले पाहिजे- सीईओ वर्षा ठाकूर जेंव्हा उंबरठ्यातील आदिशक्तीला बोलते करतात

परस्पर वीजपुरवठा केल्यास दोघांवरही कार्यवाही 

वीजचोरी पकडल्यानंतर ग्राहकांला वीजचोरी केलेल्या युनिटनुसार बिलाची आकारणी करण्यात येते. सदर आकारणीचे बिल न भरल्यास संबंधितांवर गुन्हाही दाखल होऊ शकतो. यामध्ये आकडे टाकून विजेचा वापर करणे, शेजाऱ्याकडून अथवा अन्य मार्गाने विजेचा वापर केल्यास, शेजाऱ्याने परस्पर वीजपुरवठा केल्यास दोघांवरही कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे अधिकृत वीजजोडणी घेऊनच वीजवापर करावा असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी कार्यकारी अभियंता मोहन गोपुलवाड, जनार्दन चव्हाण, श्रीनिवास चटलावार हे परिश्रम घेत आहेत.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded - MSEDCL shocks power thieves Dhadak operation in 39 villages, action against more than one thousand people Nanded News