
नांदेड : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा बोजवारा
निवघाबाजार : निवघा, तळणी परिसरातील रस्त्याची वाट लागली असून, शिरड, माटाळा, कोहळी, तळणी, वाकी, येळंब आदी गावात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून, रस्त्याची तक्रार करता, करता जनताही त्रस्त झाली. परंतू सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येईना.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून परीसरात बऱ्याच गावांना भरपूर निधी आला. सदर योजनेतून रस्ता दुरुस्त झाल्यावर संबधीत गुत्तेदारावर पाच वर्षे रस्त्याची देखभालीची जवाबदारी असते. परंतु गुत्तेदार दिलेल्या वेळात कामाला सुरुवात करीत नाहीत. पाच वर्षाची गॅरंटी संपत आल्याच्या पुढे रस्त्याच्या कामाला सुरुवात होते.
त्यामुळे रस्ता अधिक पक्का न करता थातूर, मातुर करून बिल उचलून खातात. असाच रस्ता शिरड येथील साधुबाबाच्या मंदिरामागून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झाला. पाच वर्षे न होताच हा रस्ता खड्यात गेला आहे. तर येथून जवळच असलेल्या माटाळा येथील अडिच कि.मी. रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुर होऊन संबधीत ठेकेदार थातूर, मातूर पद्धतीने व रस्ता रुंदीकरन ४५ फुट न करता ४० फुटामध्येच नाल्यासहीत करत असल्याचे माटाळा ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यानी ते काम बंद पाडले. ठेकेदाराने काम रात्रीला उरकून घेतले होते. हे प्रकरण आमदारांच्या दालनात गेल्याने गाव खुप अडचणीत असून, पावसाळ्यात संपुर्ण गावाला पैनगंगा नदीचा विळखा पडतो.
पुराचे पाणी गावात येते गावातून बाहेर जाण्यासाठी मजबूत रस्ता नाही? हे काम मजबूत करण्याच्या सुचना आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी ठेकेदारांना दिल्या. परंतू मागे पाठ अन् पुढे सपाट या युक्ती प्रमाणे रस्ता मजबूत झालाच नसल्याच्या प्रतिक्रिया माटाळा येथील ग्रामस्थांनी दिल्या. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्याची पाहणी करण्यासाठी वेळ मिळत नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. तळणी ते शिऊर हा पाच ते सात कि.मी.चा रस्ता दोन टप्यात होऊनही काम बोगस झाले आहे. मौजे वाकी येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता खरब होत असल्याने ग्रामस्थांनी काम बंद पाडले होते.
मौजे आडा येथील आबादीपासून गावात येणाऱ्या रस्त्यावर टोंगळ्या एवढे खडे पडले असून हा रस्ता मंजूर झाल्याचे कळते परंतू रस्ता कधी होणार व आडा वाशीयांना कधी सुटकारा मिळणार हे सार्वजनिक बांधकाम विभागालाच माहीत.
ठेकेदारावर कारवाई करावी
येळंब पाटी ते येळंब हा दोन कि.मी.चा रस्ता अक्षरशः चाळणी झाला असून, या रस्त्यावरून विदर्भात जाण्यासाठी मार्ग जवळ आहे. पावसाळ्याचे दिवस जवळ येत आहे. पावसाळ्यापुर्वी हे रस्ते झाले तर ग्रामस्थांना सुख मिळाले नाही तर, आजारी रुग्ण दवाखान्यात जाण्याआधी दगावल्या शिवाय राहणार नाही? निवघा, तळणी परिसरातील चार ते पाच गावांत मुख्यमंत्री ग्रामसडक योजेनेच्या रस्त्याच्या कामात मोठी तफावत असून, या सर्वच गावात एकच ठेकेदार काम करीत आहे. सदरील कोणतेही काम योग्य होत नाही? सदरील ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
वर्षानुवर्षे रस्त्याचे कामे होत नाहीत. रस्ता मंजुर होत नाही. मंजुर झालेच तर संबधीत गुत्तेदार काम व्यवस्थित करीत नाहीत? यामुळे रस्ते लवकरच चाळणी होतात. साधुबाबाच्या मंदिराजवळच्या याच रस्त्यावरून अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेताकडे जाण्यासाठी हाच रस्ता असल्याने, या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याची चौकशी करून संबधीत गुत्तेदारावर कार्यवाही करावी.
- कैलास पाटील कल्याणकर, शिरड.
सदरील ठेकेदाराचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने माटाळा ग्रामस्थांनी दोनवेळेस काम बंद केले होते. डांबराचा शेवटचा थर ठेकेदारांनी रात्रीला टाकून पोबारा केला. सदरील काम योग्य की, अयोग्य हे बघण्यासाठी कर्मचारी येऊन रस्त्याची पाहणी करून गेले, बघुया त्यांचा काय अहवाल येतो ते. या कामाबदल माटाळावाशीय नाराज आहेत हे तेवढेच खरे.
- विश्वंभर शिंदे, माजी सरपंच, माटाळा.
Web Title: Nanded Mukhyamantri Gram Sadak Yojana Talani Bad Road Conditions
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..