esakal | नांदेड महापालिकाही झाली सावध, काय केले वाचाच...
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेडला कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता नांदेड वाघाळा महापालिकाही सावध झाली आहे. महापालिकेतील आजी माजी पदाधिकारी, सदस्यांसह काही कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. 

नांदेड महापालिकाही झाली सावध, काय केले वाचाच...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची गुरुवारी (ता. २५) आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर) आणि रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण तपासण्यात आले. दिवसभरात तीनशे कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असून लवकरच सहा क्षेत्रीय कार्यालयातंर्गत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. 

नांदेड शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरातील वाढती संख्या लक्षात घेता आता नांदेड वाघाळा महापालिकाही सावध झाली आहे. महापालिकेतील आजी माजी पदाधिकारी, सदस्यांसह काही कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. 

हेही वाचा - कोरोना ब्रेकिंग - नांदेडला कोरोनाचा पंधरावा बळी
 

रुग्णांच्या संपर्कामुळे होतेय लागण
नांदेड शहरात रुग्णांची संख्या वाढत असून या ठिकाणी असलेल्या भागाची पाहणी करण्यापासून ते इतर या ना त्या कारणामुळे महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तसेच पदाधिकारी, सदस्यांनाही जावे लागते. त्यामुळे त्या ठिकाणी हे देखील कोरोना बाधित होत आहेत. पुन्हा हे सर्वजण महापालिकेत या ना त्या निमित्ताने येत आहेत. तसेच आता लॉकडाउन शिथिल केल्यापासून गेल्या दोन तीन आठवड्यात महापालिकेत दैनंदिन कामानिमित्त नागरिक येण्याचेही प्रमाण वाढले आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका कार्यालयातही कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. 

आयुक्त डॉ. लहाने यांनी घेतला निर्णय
महापालिकेतील वर्दळ वाढल्यामुळे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी महापालिका मुख्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने गुरुवारी आरोग्य तपासणीचा निर्णय घेतला. त्यानुसार तीनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 
  
आजी, माजी पदाधिकारी बाधित
चार दिवसापूर्वी माजी महापौर व त्यांचे पुत्र नगरसेवक हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर महापालिकेत काही विभाग सॅनीटाईज करण्यात आले. त्याचबरोबर तीन दिवस काही पदाधिकाऱ्यांची दालनेही सॅनीटाईज करुन बंद ठेवण्यात आली होती. तसेच जे जे प्रत्यक्षरित्या संपर्कात आले होते त्यांच्याही आरोग्याची तपासणी करण्यात आली.  

हेही वाचलेच पाहिजे - मुर्खाच्या नंदनवनात उधळलेले गाढव म्हणजे गोपीचंद पडळकर! कोण म्हणाले वाचा...

खबरदारीचा उपाय म्हणून शिबिर
कोरोना संकटात शुगर आणि बीपीचे रुग्ण हे हायरिस्कमध्ये आहेत. त्यामुळे जुन्या आजार असलेल्या व्यक्तींची काळजी घेणे आवश्‍यक आहे. महापालिकेत ५० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य शिबिर घेण्यात आले असल्याची माहिती आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी दिली.