
Nanded|नांदेड महापालिका पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी, भाजपचा पराभव
नांदेड : नांदेड-वाघाळा महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ ‘अ’ (चौफाळा, मदिनानगर) पोटनिवडणुकीत बुधवारी (ता.२२) झालेल्या मतमोजणीमध्ये काँग्रेसच्या (Congress Party) उमेदवार मुस्कान नाज सय्यद वाजीद यांनी विजय मिळवला. त्यांनी एमआयएमचे उमेदवार रेश्मा बेगम सलीम बेग यांचा २००५ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक १३ ‘अ’ (चौफाळा, मदिनानगर) पोटनिवडणुकीसाठी (Nanded Municipal Corporation Bypoll) मंगळवारी (ता.२१) आठ हजार ३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ३७.४७ टक्के होती. हा प्रभाग अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव होता आणि तीन उमेदवार रिंगणात होते. बुधवारी सकाळी दहा वाजता स्टेडियम परिसरातील कार्यालयात मतमोजणीला सुरूवात झाली. (Nanded Municipal Corporation Bypolls 2021 Congress Win, BJP On Back Foot)
एकूण चार टेबलवर सात फेऱ्यांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. काँग्रेसच्या उमेदवार मुस्कान नाज सय्यद वाजीद यांना चार हजार २३० मते मिळाली. एमआयएमचे (MIM) उमेदवार रेश्मा बेगम सलीम बेग यांना दोन हजार २२५, तर भाजपच्या (BJP) उमेदवार लक्ष्मीबाई जोंधळे यांना एक हजार ४९० मते मिळाली. नोटाला (वरीलपैकी एकही नाही) ९४ मते मिळाली. निवडणुकीची प्रक्रिया आयुक्त तथा निवडणुक अधिकारी डॉ. सुनील लहाने यांच्या नियंत्रणाखाली पार पडली. निवडणुक निर्णय अधिकारी लतिफ पठाण, सहायक निवडणुक निर्णय अधिकारी आर. डब्ल्यू. मिटकरी व गुलाम सादीक, निवडणूक विभागातील कर्मचारी अख्तर बेग इनामदार, मोहमंद युनुस अब्दुल गफार व इतर कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. पोलिस विभागाच्या वतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणुक निर्णय अधिकारी लतिफ पठाण यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
काँग्रेसतर्फे विजयाचा जल्लोष
काँग्रेसच्या उमेदवार मुस्कान नाज विजयी झाल्यानंतर कॉँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष साजरा केला. आयटीएम येथे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमहापौर अब्दुल गफार, माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला, विजय येवनकर, नगरसेवक प्रतिनिधी सय्यद वाजीद, नगरसेवक चांदपाशा कुरेशी, लतिफ लोखंडवाला, प्रवक्ते तथा नगरसेवक मुन्तजीब, अजिज कुरेशी, फारूख शेख, अझर कुरेशी, अतिफ विखास, मोहमंद गौस बागवान, नईम अब्दुल्ला, शाफे सौदागर, एम. डी. मुन्ना, इलियास, सय्यद रिहान, निखील चौधरी आदी उपस्थित होते. देगलूर - बिलोली विधानसभेची पोटनिवडणुक कॉँग्रेसने जिंकली आणि त्यानंतर आता महापालिकेची पोटनिवडणुकही काँग्रेसने जिंकली असून याचे श्रेय राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नियोजनाला तसेच त्यांनी गेल्या दोन वर्षात नांदेड जिल्ह्यासाठी केलेल्या विकासकामांना जाते. त्याचबरोबर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने नियोजनबद्ध केलेल्या प्रचाराला जात असल्याचे माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांनी सांगितले.