esakal | नांदेड महापालिकेला घ्यावा लागणार हात आखडता...

बोलून बातमी शोधा

नांदेड महापालिका

नांदेड वाघाळा महापालिकेची स्थापना ता. २६ मार्च १९९८ रोजी झाली असून २०२० - २०२१ चा महसुली अर्थसंकल्प हा जवळपास चारशे कोटी रुपयांचा आहे. गेल्या काही दिवसांपासून जमा आणि खर्च यांचा ताळमेळ घालताना महापालिकेसमोर अनेक अडचणी येत आहेत. त्यातच आता कोरोनाचे संकट आले आहे. 

नांदेड महापालिकेला घ्यावा लागणार हात आखडता...
sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - महापालिकेची आधीच आर्थिक परिस्थिती बिकट असतानाच त्यात कोरोना आणि लॉकडाउनचे संकट आले. त्यामुळे आता महापालिकेला फक्त अत्यावश्‍यक सेवांकडे लक्ष द्यावे लागणार असून अनेक कामांमध्ये आर्थिक परिस्थितीमुळे हात आखडता घ्यावा लागणार आहे. 

नांदेड वाघाळा महापालिकेची स्थापना ता. २६ मार्च १९९८ रोजी झाली असून २०२० - २०२१ चा महसुली अर्थसंकल्प हा जवळपास चारशे कोटी रुपयांचा आहे. मालमत्ता कर, स्थानिक संस्था कर, नगररचना बांधकाम परवानगी, पाणीपट्टी आणि इतर वसुलीतून महापालिकेला पैसा येतो. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने विविध अनुदाने मिळतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जमा आणि खर्च यांचा ताळमेळ घालताना महापालिकेसमोर अनेक अडचणी येत आहेत. त्यातच आता कोरोनाचे संकट आले आहे. 

हेही वाचा - पॉझिटिव्ह न्यूज - सहा महिन्याच्या चिमुकलीने कोरोनाला हरवले...

कोरोना, लॉकडाउनचे संकट
मार्च महिना हा सर्वात जास्त वसुलीचा असतो. मात्र, यंदा मार्च महिन्यातच कोरोना विषाणू आल्याने लॉकडाउन झाले. त्यामुळे त्याचा परिणाम विविध करांच्या वसुलीवर झाला. मालमत्ता कराच्या बाबतीत जवळपास दहा कोटींची वसुली कमी झाली. पाणीपट्टीतही दहा ते बारा कोटींची वसुली कमी झाली. महापालिकेच्या स्वतःच्या जागा, गाळेभाडे, होल्डिंग्ज, तयबाजारी यामध्ये देखील जवळपास एक कोटी रुपयांना फटका बसला आहे. बांधकाम परवानगीही जवळपास दोन अडीच महिन्यापासून बंद असल्यासारखीच आहे. त्यामुळे आता कोरोना आणि लॉकडाउनच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी महापालिका प्रशासनाला प्रयत्न करावे लागणार आहेत. 

महापालिकेवर १५० कोटींचे कर्ज
पूर्वी आयएलएफएस यांच्याकडून १७० कोटी कर्ज घेतले होते. ते फेडून महापालिकेने हुडकोकडून १५० कोटीचे कर्ज घेतले आहे. त्यामुळे महापालिकेवर सध्या १५० कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यापैकी आत्तापर्यंत ३८ कोटी रुपयांची परतफेड झाली आहे. दर तीन महिन्याला व्याज आणि मुद्दल असे साडेसहा कोटी रुपये महापालिकेला भरावे लागतात. दहा वर्षासाठी घेण्यात आलेले कर्ज असून त्यातील चार वर्ष संपली आहेत. त्यामुळे आणखी सहा वर्ष कर्जाचे हफ्ते महापालिकेला भरावे लागणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली. 

हेही वाचलेच पाहिजे - ब्रेकिंग न्यूज - नांदेडला एका दिवसात २३ पॉझिटिव्ह -

अत्यावश्‍यक कामांवर भर - आयुक्त डॉ. लहाने
महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने म्हणाले की, कोरोना आणि लॉकडाउनमुळे महापालिका प्रशासनाला गेल्या जवळपास अडीच महिन्यापासून त्या कामात रहावे लागत आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता जवळपास सर्व अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या नियंत्रण मोहिमेत कामात आहेत. मार्च महिन्यात ज्यांनी कराचा भरणा केला नाही त्यांनी भरणा करावा तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी तसेच विविध संस्था, प्रतिष्ठाने यांनी मागील तसेच चालू वर्षाचा कराचा भरणा करुन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. लहाने यांनी केले आहे. सध्या महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा, दिवाबत्ती, स्वच्छता व साफसफाई तसेच अत्यावश्‍यक कामांनाच प्राधान्य देण्यात येत आहे.