नांदेड : राष्ट्रीय महामार्गामुळे किनवट शहराच्या वैभवात भर पडणार

मिलिंद सर्पे
Sunday, 29 November 2020

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून ग्रामीण भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे.भोकर ते धनोडा पर्यंत राष्ट्रीय महामार्गा मुळे किनवट व माहूर सारखा मागास,दुर्गम आदिवासी भाग व्यापार तसेच औद्योगिक दृष्ट्या सक्षम होणार आहे.

किनवट (जिल्हा नांदेड) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. महामार्ग हा बाजारपेठेच्या वृद्धीसाठी फायदेशीर ठरणार असतानाही "इको सेन्सिटिव्ह झोन" अभयारण्याच्या नावाखाली काही लोक शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु, वाढत्या बाजारपेठेबरोबरच शहराच्या विस्तारीकरणासाठी राष्ट्रीय महामार्गाचे काम अंदाज पत्रकाप्रमाणे १२० फुटाचे करावे. चार दोन लोकांच्या नुकसानीसाठी संपूर्ण शहराला वेठीस धरण्याचे काम करू नये, अन्यथा मराठी पत्रकार परिषद नागरिकांच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा इशारा किनवट तालुका मराठी पत्रकार परिषदेने दिला आहे. 

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून ग्रामीण भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे.भोकर ते धनोडा पर्यंत राष्ट्रीय महामार्गा मुळे किनवट व माहूर सारखा मागास,दुर्गम आदिवासी भाग व्यापार तसेच औद्योगिक दृष्ट्या सक्षम होणार आहे.राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.अंदाज पत्रकाप्रमाणे हा मार्ग किनवट शहरातून जाणार आहे.शहरातून जाणाऱ्या १२० फूट रुंद रस्त्याला संपूर्ण तालुक्याच्या पाठिंबा असतानाही शहरातील काही मोजके लोक "इको-सेन्सिटिव्ह झोन" अभयारण्याच्या नावाखाली शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा निर्माण करत असल्याचे पत्रकार संघटनेचे म्हणणे आहे.१२० फुटाचा रस्ता शहरातून गेला तर शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून या रस्त्यामुळे बाजारपेठेची वृद्धी होऊन व्यापार व उद्योगाला चालना मिळणार आहे.

हेही वाचा -  हिंगोली : सेनगावकरांना आरक्षण सोडतीनंतर नव्या चेहऱ्याची प्रतीक्षा, तर प्रभाग सतराने वेधले दिग्गजांचे लक्ष

विशेष म्हणजे शहरातील अरुंद रस्त्यामुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.अरुंद रस्त्यामुळे कित्येकवेळी अपघाताचे प्रसंग उद्भवले आहेत.शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम झाल्यास शहराचा भविष्यात मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे.परंतु, दोन चार लोकांसाठी या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात बदल करण्याचा प्रयत्न झाल्यास मराठी पत्रकार परिषद हे कदापि सहन करणार नाही.राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी कोणाच्याही अडथळयाला ना जुमानता अंदाज पत्रकाप्रमाणे शहरातून १२० फुटाचा रस्ता तयार करावा, अशी मागणी किनवट तालुका मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष अनिल भंडारे व तालुका सचिव मलिक चव्हाण यांनी केली असून रस्त्याच्या कामात बदल केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: National Highway will add to the splendor of Kinwat city nanded news