Nanded : नववर्षाचे जल्लोषात स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड

Nanded : नववर्षाचे जल्लोषात स्वागत

नांदेड : गेली दोन वर्ष नागरिकांना विशेषतः तरुणाईस कोरोना प्रादुर्भावामुळे लागलेल्या निर्बंधामुळे नवीन वर्षाचा आनंद मुक्तपणे मनाजोगा साजरा करता आला नाही. मात्र, यावर्षी निर्बंधमुक्त वातावरणात सरत्या वर्षाला निरोप देत व नववर्ष २०२३ चे स्वागत करताना, शहरात पार्टी आॅल नाईट असे चित्र शनिवारी (ता.३१) दिसून आहे. पहाटे पाच वाजेपर्यंत बार व रेस्टॉरंट सुरु ठेवल्याने तरुणांच्या उत्साहात भर पडली.

नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी म्हणून शहरातील बार आणि मोठ-मोठ्या हॉटेलमध्ये विविध रंगारंग कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात संगीतावर तरुणाई थिरकून जल्लोषात नववर्षाचे स्वागत करताना दिसून आले. तरुणाई बेधुंद होत नृत्यावर थिरकताना दिसून येत होती. याशिवाय जीवलग मित्र-मैत्रिणींची सोबत, मद्यासह खाद्यपदार्थांच्या मेजवान्यांची रेलचेल, फटाक्यांची आतषबाजी, शुभेच्छांचा वर्षाव अशा जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये नांदेडकरांनी नवीन वर्षाचे स्वागत केले. आबालवृद्धांसह तरुणाईचा त्यामध्ये मोठा सहभाग होता.

काही तरुणांनी गाण्याचा सूर आळवत नववर्षाचे स्वागत केले. नववर्ष स्वागताच्या नियोजनात पर्यटनालाही मोठे महत्त्व मिळाल्याचे बघायला मिळाले. शुक्रवारपासूनच (ता.३०) शहरालगतचे फार्म हाऊस आणि शेतीवर थर्टी फस्टचा आनंद अनेकांनी घेतला. मद्याच्या दुकानांमध्येही मद्यप्रेमींची गर्दी दिसून आली. नववर्षाच्या निमितातने अनेकांनी देवदर्शनालाही गर्दी केली होती.

रविवारीही जल्लोष कायम

वर्षाच्या पहिल्याच दिवशी शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने नवीन वर्ष साजरा करणाऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाला. त्यामुळे रविवारीही नववर्षाच्या आगमनाचा जल्लोष कायम दिसून आला. अनेकांनी शनिवार, रविवारची सुट्टी आणि नवीन वर्षाचे औचित्य साधत पर्यटनाचे नियोजन केल्याने, त्यांना कुटुंबीयांसह वेळ घालवता आला.