नांदेड : नवनिर्वाचित ग्रामपंचायतींना पहिल्या टप्प्यात दहा लाखाचा निधी उपलब्ध करुन देणार- शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव 

file photo
file photo

नांदेड : जिल्ह्यात शिवसेनेने यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत इतिहास घडवत साडेतिनशे ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला असून, या सर्व ग्रामपंचायतींना पहिल्या टप्प्यात दहा लक्ष रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा नांदेड- बीड- हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी आज येथे केली.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आनंदराव जाधव हे बोलत होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तळागाळात शिवसेनेचे असलेले कार्य, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गेल्या १४ महिन्यात केलेले कार्य याची ही पावती असून, या साडेतिनशे ग्रामपंचायतींना पहिल्या टप्प्यात दहा लक्ष रुपयांचा निधी लवकरच वितरीत होईल, यासोबतच या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजना, घरकुल योजना, ग्रामपंचायतींची भव्य इमारत यासाठी टप्प्याटप्प्याने मुख्यमंत्री निधी देणार असल्याचे त्यांनी यावेळी घोषित केले.

गावपातळीवर शिवसेनेचे कार्य वाढविण्यासाठी गाव तेथे शाखा तसेच पक्ष नोंदणीसंदर्भात तालुकाप्रमुख व शहरप्रमुखांना आता कंबर कसायची असून, येत्या आठवड्यात स्थानिक लोकाधिकारी समितीचे निरीक्षक नांदेड जिल्ह्यात येणार असून, त्यांच्यासमोर वस्तूनिष्ठ अहवाल मांडून पक्ष पातळीवरच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. यासोबतच विधानसभेतील दोन आमदार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जावून आढावा घेणार असून, येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपंचायत, पंचायत समित्या, महापालिका निवडणुकांसाठी आजपासूनच कामाला लागायचे आहे. महाविकास आघाडी असली तरी आघाडी होवो अथवा न होवो आपल्याला पक्ष वाढवून मोठ्या प्रमाणात पक्षाची ताकद निर्माण करायची आहे. 

काही तालुक्यांच्या ठिकाणी व्यवस्थित काम होण्यासाठी त्या त्या पदाधिकाऱ्यांनी आजच लक्ष घालून सदस्य नोंदणीच्या कामात स्वतः ला झोकून द्यायचे आहे. राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री या नात्याने केलेल्या कामाचे कौतूक जागतिक पातळीवर झाल्याने त्याचे परिणाम ग्रामपातळीवरील देखील चांगले दिसू लागले आहेत. त्याचाच परिपाक म्हणून आपल्याला या निवडणुकीत यश मिळाले आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याबाबत पदाधिकारी व कार्यकत्र्यांच्या असलेल्या तक्रारी तसेच वेगवेगळ्या नियुक्त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, या सर्व बाबी आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा तीन विधानसभा मतदारसंघात एक या प्रमाणे मेळावा घेवून संपर्कमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार केला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

यावेळी बोलताना आमदार बालाजी कल्याणकर यांनी पक्षसंघटना वाढविण्यासाठी जिल्ह्यातील एकमेव मी आमदार असल्याने आपण बोलवाल त्याठिकाणी मी येणार आणि यासाठी मेहनत घेणार असल्याचे स्पष्ट केले. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगून जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात त्यांनी शब्द दिल्याचे आमदार कल्याणकर यांनी सांगितले. 

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंदराव पाटील बोंढारकर, उमेश मुंढे, लोकसभा संघटक डॉ. मनोज भंडारी, जि.प.चे गटनेते विजय बास्टेवाड, उपजिल्हाप्रमुख संजय ढेपे, तालुकाप्रमुख उत्तम चव्हाण, शहरप्रमुख सचिन किसवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हा पातळीवर निधी वाटप करताना तसेच वेगवेगळ्या समित्यासंदर्भात शिवसेनेला न्याय दिला पाहिजे, अशी भूमिका मांडली. उपाध्यक्ष पद्मारेड्डी सतपलवार यांचे प्रतिनिधी तथा धर्माबादचे तालुकाप्रमुख आकाश रेड्डी यांनी माझे निवासस्थान आता सर्व शिवसैनिकांसाठी खुले असणार असून, आपल्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काँग्रेसचे सर्वाधिक पदाधिकारी असल्याने निधी देतांना अन्याय होत असून, यापुढे अशा पक्षपाती वागणुकीसंदर्भात आक्रमक भूमिका घेवून आपण संबंधितांना जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किशन फटाले यांनी केले. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, जि. प. सदस्य उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com