Nanded News : महापालिका निवडणुकीची पूर्वतयारी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Waghala Municipal Corporation election

Nanded News : महापालिका निवडणुकीची पूर्वतयारी सुरू

नांदेड : राज्यातील महापालिका निवडणुकीची पुर्वतयारी सुरू करा, असे आदेश नगरविकास विभागाने सर्व महापालिका आयुक्तांना मंगळवारी (ता. २२) बजावले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नांदेड वाघाळा महापालिकेच्या वतीने प्रभागांची संख्या आणि रचना निश्चित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मागील महाआघाडी सरकारने सदस्यसंख्या वाढवून ९२ केली होती आणि तीन सदस्यीय ३१ प्रभागाच्या रचनेला अंतिम स्वरूप देण्यात आले होते. मात्र, नवीन शिंदे - फडणवीस सरकारने वाढवलेली ९२ सदस्य संख्या रद्द केल्याने आता पुन्हा पूर्वीइतकेच ८१ सदस्य राहणार आहेत.

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी छापवाले यांनी मंगळवारी काढलेल्या आदेशात मुंबई महापालिका अधिनियम १८८८ आणि महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ मध्ये संदर्भीय अधिनियमानुसार सुधारित केलेल्या तरतूदीप्रमाणे मुदत संपलेल्या व नजीकच्या कालावधीत मुदत संपत आलेल्या महापालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी लगतच्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या व रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नांदेड वाघाळा महापालिकेच्या वतीने त्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकसंख्या वाढीच्या आधारावर सरासरी प्रभाग संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार नांदेडला ८१ वरून ९२ सदस्य संख्या आणि ३१ प्रभाग झाले होते. आता पुन्हा शिंदे - फडणवीस सरकारने ही प्रभाग रचना रद्द केली त्यामुळे पुर्वीचीच ८१ सदस्य संख्या राहणार आहे. त्यामुळे त्यानुसार तीन सदस्य एका प्रभागात घेतले तर पुन्हा २७ प्रभाग होणार आहेत. त्यामुळे पुन्हा २७ प्रभागाची रचना तयार करण्याचे काम महापालिकेला हाती घ्यावे लागणार आहे.

इच्छुकांचे तूर्त ‘वेट ॲण्ड वॉच’

दरम्यान, सर्वच राजकीय पक्षातील नेतेमंडळी आणि इच्छुक या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत. दरवेळेस वेगवेगळे निर्णय समोर येत आहेत त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, न्यायालयाचा निर्णय या सगळ्या घटना लक्षात घेता तूर्त इच्छुकांनी ‘वेट ॲण्ड वॉच’ ही भूमिका ठेवली आहे. जेव्हा अंतिम निर्णय होईल, तेव्हा पाहू, असे म्हणत अऩेक इच्छुकांनी आपआपले पत्ते सध्या तरी बंदच ठेवले आहेत.