नांदेड : पावसाच्या लपंडावाने शेतकरी चिंतेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Farmer

नांदेड : पावसाच्या लपंडावाने शेतकरी चिंतेत

नांदेड : जून महिना संपत आला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. कधी ऊन, कधी ढगाळ वातावरण तर कधी रिमझीम पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पावसाअभावी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांच्या दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पेरणी केल्यानंतर पाऊस बेपत्ता झाल्याने लहान कोंब नष्ट होण्याचा धोका वाढला आहे. यामुळे दुबार पेरणीची शक्यता वर्तविली जात आहे. आणखी काही दिवस पावसाची शक्यता कमी असल्याने पेरणी केलेली पीक वाया जाण्याची शक्यता असून शेकडो हेक्टरवर पेरणी केलेले बियाणे, खते वाया जाणार असल्याने अगोदर आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडणार आहे.

पाऊस समाधानकारक नसल्याने पेरणीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील काही भागात तुरळक पाऊस, तर काही भागात उन्हाळी वातावरण आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील काही भागात रोपे उगवली आहेत. परंतु, पुरेसा पाऊस पडला नसल्याने काही शेतकरी स्प्रिंकलरच्या माध्यमातून रोपांना पाणी देत आहेत. पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी मका, ज्वारी, तूर, कापूस, सोयाबीन आदी खरीप पिकांची पेरणी केली. परंतु, त्यावर पाऊस पडला नाही. यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येऊन ठाकले आहे. यंदा मोठ्या प्रमाणात बियाणे आणि खतांच्या किमतीत वाढ झाली. शेतकऱ्यांनी महागाईने घेतलेल्या बियाण्यांची शेतात पेरणी केली. मात्र, काही भागात कडक ऊन पडल्याने पिकांची कोंब जळून जात आहेत. पावसाचे चिन्हे दिसत नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागलेल्या आहेत.

पेरणीची कामे लांबणीवर

पाऊस लवकर पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवला होता. त्यामुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी पेरणीची कामे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु केली. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला होता आणि पेरणीची लगबगही सुरु झाली होती. मात्र, पेरणीयोग्य पाऊस पडत नसल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी थांबवली. परिणामी पेरणीची कामे लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यामुळे आम्ही यावर विश्वास ठेऊन पेरणी केली. मात्र, पावसाने दडी मारली. हवामान विभागाचे सर्व अंदाज फोल ठरले. त्यामुळे आमच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे हवामान विभागाने असे चुकीचे अंदाज वर्तवणे बंद करावे.

- पुरुषोत्तम काकडे, शेतकरी.

Web Title: Nanded No Monsoon Rain Farmer Sowing Crisis Seed Fertilizer Waste

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..