नांदेड - शासकीय रुग्णालयात कोविडसाठी एक हजार किलो लिटर क्षमतेचे आॅक्सिजन टॅंक सुविधा 

शिवचरण वावळे
Sunday, 6 September 2020

विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील कोविड बेडची संख्या लवकरच २०० वरुन ४०० इतकी होणार आहे. 

नांदेड - जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारासाठी जागेची कमतरता भासत आहे. त्यामुळे विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील कोविड बेडची संख्या लवकरच २०० वरुन ४०० इतकी होणार आहे. 

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या वाढत आहे. त्यामुळे शहरातील कोविड सेंटरमध्ये आता जागाच शिल्लक राहिलेली नाही. विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयातही रुग्णांसाठी खाटा कमी पडत आहे. त्यामुळे रुग्णालयात खाटांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु होते. त्याला आता अंतिमस्वरूप आले असून, लवकरच कोविड विभागात २०० नवीन खाटा उपलब्ध होणार आहेत. 

नवीन खाटा टाकण्यासाठी शासकीय रुग्णालयाने तयारी पूर्ण केली असून, पुढील दोन ते चार दिवसात हपकीनकडून बेड उपलब्ध होताच. रुग्णालयात १६० ते ४० अशी बेड संख्या वाढविण्यात येणार आहे. सध्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी २०० बेड उपलब्ध असून, ५० व्हेंटीलेटर यासह ‘रेमेडिएस’ इंजेक्शन साठा, व्हिटॅमिनच्या गोळ्या व इतर औषधीसाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

हेही वाचा- नांदेडमध्ये ‘सी.एच.बी.’ प्राध्यापकांनी दिल्या काळ्या शुभेच्छा

पॉझिटिव्ह रुग्ण अगदी शेवटच्या टप्यात रुग्णालयात 

वातावरणात बदल झाल्यामुळे अनेक नागरिकांना सर्दी, खोकला, घशात खवखव होणे, अंग दुखणे यासारखी कोरोनाची लक्षणे आढळुन येत आहेत. मात्र भितीने कोरोनाच्या या लक्षणांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी औषधी दुकानदारांकडून ताप सर्दीच्या गोळ्या खावून दुखणे अंगावर काढण्याचे प्रकार होत आहे. गोळ्या खावून देखील कोरोनाची लक्षणे थांबली नसल्यास शेवटच्या क्षणी कोरोनाची टेस्ट करुन घेण्यासाठी नागरीक तयार होतांना दिसत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण अगदी शेवटच्या टप्यात रुग्णालयात दाखल होत असल्याने मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. 

हेही वाचा- नांदेड- राज्यातील एसटी चालक-वाहक महिला न्यायाच्या प्रतिक्षेत ​

मराठवाड्यात प्रथमच  

कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांमध्ये ५० वर्षे वयोगटातील सर्वाधिक रुग्ण असून, अशा रुग्णांना देखील चांगल्यातला चांगला उपचार मिळावा यासाठी शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया वार्ड क्रमांक एक व दोन याठिकाणी १६० अधिक ४० अशा पद्धतीने दोनशे बेड वाढविण्यात येत आहेत. शिवाय मराठवाड्यात प्रथमच नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एक हजार किलो लिटरचे दोन लिक्वीड आॅक्सीजन टॅंक बसविण्यात आले आहेत. सध्या कोरोना बाधित रुग्ण सेवेसाठी ३६ तज्ज्ञ डॉक्टर व १५० निवासी डॉक्टर कर्तव्यावर आहेत. गरज पडल्यास अजून डॉक्टरांची संख्या वाढविण्याचा मानस असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. 

औषधींसाठी मुबलक प्रमाणात 
जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता आकडा बघता शासकीय रुग्णालयात १६० अधिक ४० असे एकुण २०० बेड येत्या दोन दिवसात वाढविण्यात येणार आहेत. ‘रेमेडिएस’ इंजेक्शन साठा, व्हिटॅमिनच्या गोळ्या व इतर औषधींसाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.
- डॉ. वाय. एच. चव्हाण (वैद्यकीय अधिक्षक, नांदेड) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded - One thousand kiloliter capacity oxygen tank facility for Kovid at Government Hospital Nanded News